पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू आणि पंच मोहम्मद नजीर यांचं वयाच्या 78व्या वर्षी निधन झालं. त्यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब होती. मोहम्मद नजीर यांचा मुलगा नौमन नजीर यानं वडिलांच्या निधनाची बातमी दिली आहे. नजीर यांनी पाकिस्तानसाठी 14 कसोटी आणि 4 एकदिवसीय सामने खेळले. मात्र ते त्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीसाठी सर्वाधिक ओळखले जायचे.
शेवटच्या आठवड्यात नजीर खूप आजारी पडले होते. त्यांना छातीत जंतुसंसर्ग झाला होता आणि ते जलोदर नावाच्या आजारानंही ग्रस्त होते. त्यांच्यावर लाहोरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. नजीर यांचा मुलगा नौमान यानं काही काळापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) वडिलांच्या वैद्यकीय तपासणीसाठी मदत देण्याची विनंती केली होती. या दिग्गज पाकिस्तानी क्रिकेटरची तब्येत ढासळण्याचं एक कारण म्हणजे ते 5 वर्षांपूर्वी एका अपघाताचे बळी ठरले होते. त्यानंतर त्यांना सतत आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं.
मोहम्मद नजीर उजव्या हातानं ऑफ-स्पिन गोलंदाजी करायचे. त्यांनी पाकिस्तानसाठी 14 कसोटी सामन्यात 34 विकेट घेतल्या. याशिवाय 4 एकदिवसीय सामन्यात त्यांच्या नावावर 3 विकेट आहेत. त्यांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीपेक्षा प्रथम श्रेणी कारकिर्दीच्या आकडेवारीसाठी अधिक ओळखलं जायचं. नजीर यांनी आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 180 सामने खेळले, ज्यात त्यांनी तब्बल 829 विकेट घेतल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी दोन शतकी खेळीसह 4,242 धावाही केल्या आहेत.
नजीर यांनी क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतर अंपायरिंगही केलं. त्यांनी पाच कसोटी आणि 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केलं. आपल्या कारकिर्दीत ते 1970 च्या दशकातील सर्वोत्तम संघांपैकी एक असलेल्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामने खेळले होते. त्यांनी महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्सला एकाच मालिकेत अनेकवेळा बाद करण्याचा पराक्रम केला होता.
हेही वाचा –
IND VS AUS; कांगारुंचा दबदबा, पहिल्या डावात टीम इंडिया 150 धावांत गारद!
आयपीएल मेगा लिलावाची वेळ बदलली, जाणून घ्या किती वाजता सुरू होणार खेळाडूंचा लिलाव
शुबमन गिलच्या दुखापतीबाबत बीसीसीआयचे अपडेट, जाणून घ्या कधी मैदानात परतणार