संपूर्ण क्रिकेट जगताच्या नजरा आता पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या आशिया चषकावर खिळल्या आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तान या दोन तुल्यबळ संघात सामना होईल. भारतीय संघाकडे मागील टी२० विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी या स्पर्धेसाठीचे आपले आवडते संघदेखील सांगितले आहेत. पाकिस्तानचे माजी कर्णधार व दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांनी देखील या स्पर्धेसाठी निवडल्या गेलेल्या पाकिस्तान संघाविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच एक वर्चुअल पत्रकार परिषद आयोजित केली गेली होती. यामध्ये वसीम अक्रम यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. पाकिस्तान संघाबद्दल विचारले असता त्यांनी आपले मत मांडले. अक्रम म्हणाले,
“मला विचाराल तर मी निश्चितपणे सांगू शकतो की, पाकिस्तान संघाची मधली फळी कमजोर आहे. त्यांना याचे नुकसान संपूर्ण स्पर्धेत होऊ शकते.”
त्याचवेळी या सामन्याला फक्त एका क्रिकेट सामन्याच्या दृष्टीने पाहण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला. ते म्हणाले,
“भारत पाकिस्तान सामन्याची नेहमीच चर्चा असते. हे दोन्ही संघ सातत्याने एकमेकाविरुद्ध खेळत नाहीत. मात्र, सर्वांनी या सामन्याला एका सामान्य सामन्याप्रमाणेच घ्यावे. एक संघ हरणार आहे आणि एक संघ जिंकणार आहे.”
भारताचे माजी क्रिकेटपटू व वरिष्ठ समालोचक रवी शास्त्री यांनी देखील मीडिया बनवत असलेल्या वातावरणापासून दूर राहायला हवे असे म्हटले. उभय संघातील हा सामना २८ ऑगस्ट रोजी दुबई येथे खेळला जाईल. याच गटात पात्रता फेरीतील आणखी एक संघ सामील होईल. त्यानंतर सुपर फोर व अंतिम सामना खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आता आयपीएल तेव्हाच खेळेल, जेव्हा…’; बेन स्टोक्सने केले महत्वाचे विधान
काय गोलंदाजी केलीस भावा? सगळेच फलंदाज शून्यावर बाद, १५ चेंडूत पालटला सामना
नातं तुटल्याच्या चर्चांनंतर एका महिन्यासाठी धनश्री जातेय माहेरी! ऐकून चहलने दिली अशी प्रतिक्रिया