पाकिस्तान संघाला 23 ऑक्टोबर रोजी विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 22व्या सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला 8 विकेट्सने पराभूत केले. या पराभवानंतर बाबर आझम याच्या नेतृत्वातील संघावर टीकास्त्र डागण्यात आले. यामध्ये आजी-माजी खेळाडूंचा समावेश होता. माजी कर्णधार वसीम अक्रम यानेही संघावर ताशेरे ओढले.
काय म्हणाला अक्रम?
माजी दिग्गज खेळाडू वसीम अक्रम (Wasim Akram) म्हणाला, पाकिस्तानी खेळाडूंना फिटनेसवर काम करण्याची खूपच गरज आहे. पाकिस्तानी संघाचा विश्वचषक 2023 स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव होता. त्यामुळे त्यांच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग खूपच खडतर झाला आहे. पाकिस्तानचा हा वनडे इतिहासातील अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला पराभव आहे.
या पराभवानंतर अक्रम म्हणाला की, “हा लज्जास्पद आहे. 280-290 धावासंख्या मोठी होती, आणि फक्त विकेट्स. खेळपट्टी ओली नव्हती. क्षेत्ररक्षण खराब होते. तुम्ही फिटनेसचा स्तर पाहा. आपण या बाबतीत चर्चा केली आहे की, मागील दोन वर्षांमध्ये कोणतीच फिटनेस टेस्ट झाली नाहीये. जर मी इथे कोणाचे वैयक्तिक नाव घेतले, तर त्यांना आवडणार नाही. असे वाटते की, ते दररोज 8 किलो मटण खात आहेत.”
अक्रमचे गंभीर आरोप
अक्रमने गंभीर आरोप लावत म्हटले की, पाकिस्तानी खेळाडूंना फिटनेस टेस्ट आवडत नाही. हे परीक्षण माजी मुख्य प्रशिक्षक मिस्बाह उल हकद्वारे सांभाळले जात होते, पण त्या टेस्टमुळे संघाला आपल्या मूलभत गोष्टी व्यवस्थित करण्यात मदत मिळते. तो म्हणाला, “टेस्ट झाली पाहिजे. व्यावसायिकरीत्या तुम्ही देशासाठी खेळत आहात आणि यासाठी तुम्हाला पैसे दिले जात आहे. मी मिस्बाहसोबत आहे. जेव्हा तो प्रशिक्षक होता, तेव्हा ही त्याची पद्धत होती. खेळाडू त्याचा तिरस्कार करायचे. मात्र, हे संघासाठी फायदेशीर होते.”
पुढे बोलताना अक्रम असेही म्हणाला की, “क्षेत्ररक्षण हे पूर्णत: फिटनेसच्या बाबतीत आहे आणि हे मैदानावर दिसते. आता आम्ही अशा जागी पोहोचलो आहे, जिथे आपण प्रार्थना करू. आपले सामने जिंकण्याची प्रार्थना करू. इतर संघ पराभूत होण्याची वाट पाहू, तेव्हाच आपल्याला उपांत्य सामन्यात पोहोचण्यात मदत मिळेल.”
पाकिस्तान संघाच्या पुढील सामन्याविषयी बोलायचं झालं, तर 27 ऑक्टोबर रोजी त्यांना दक्षिण आफ्रिकेचा सामना करायचा आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. (former pakistani cricketer wasim akram blasts pakistan players for their fitness after poor show against afghanistan in world cup 2023)
हेही वाचा-
विश्वचषकाच्या मध्येच बोर्डाने केली Central Contractची घोषणा, दिग्गज खेळाडूबाबत घेतला हैराण करणारा निर्णय
मोठी बातमी! पंड्याच्या दुखापतीवर आली सर्वात मोठी अपडेट, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याला…