भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली हा टी20 विश्वचषकात तुफान फॉर्ममध्ये आहे. विराटने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातही अर्धशतक झळकावत एका विक्रमात ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेल यालाही पछाडले आहे. विशेष म्हणजे, आता काही विक्रमांमध्ये अव्वलस्थान पटकावण्यासाठी विराट फक्त एक पाऊल दूर आहे. चला तर कोणते आहेत ते विक्रम जाणून घेऊया…
झाले असे की, भारतीय संघ आणि नेदरलँड्स संघात गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) सिडनी येथे झालेल्या सामन्यात भारताने 56 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने 37 चेंडूत अर्धशतक साजरे केले. दुसरीकडे, विराटने विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावत भारताला विजय मिळवून दिला होता. यावेळी त्याने 53 चेंडूत 82 धावा चोपल्या होत्या. विशेष म्हणजे, या विश्वचषकातील दोनही सामन्यात विराट नाबाद राहिला आहे.
नेदरलँड्सविरुद्ध 140.90च्या स्ट्राइक रेटने केल्या धावा
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. दुसऱ्या सामन्यातही विराटने 44 चेंडूत 62 धावांची वादळी खेळी केली. यादरम्यान विराटने 2 षटकार आणि 3 चौकार मारले. नेदरलँड्सविरुद्धच्या डावात विराटचा स्ट्राईक रेटही 140.90 इतका राहिला होता.
Virat Kohli brings up back-to-back fifties 🔥#T20WorldCup | #NEDvIND | 📝: https://t.co/9FPx3tOBBe pic.twitter.com/IAUuu33nrZ
— ICC (@ICC) October 27, 2022
विश्वचषकात इतिहास रचण्यापासून फक्त 27 धावा दूर
अशाप्रकारे विराट टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याने वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेल यालाही मागे सोडले आहे. विराटने आतापर्यंत टी20 विश्वचषकाच्या इतिहासात एकूण 23 टी20 सामने खेळले आहेत, त्यातील 21 डावांमध्ये त्याने 989 धावा केल्या आहेत. आता तो 1 हजार धावांपासून 11 धावाच दूर आहे. तसं पाहिलं, तर टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने (Mahela Jayawardene) याच्या नावावर आहे. त्याने 31 सामन्यांमध्ये 1016 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे विराट त्याचा विक्रम मोडण्यापासून फक्त 27 धावा दूर आहे. हा विक्रम कदाचित पुढील सामन्यात तुटू शकतो.
टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
1016 धावा (31 सामने)- माहेला जयवर्धने (श्रीलंका)
989 धावा (23 सामने)- विराट कोहली (भारत)*
965 धावा (33 सामने)- ख्रिस गेल (वेस्ट इंडिज)
904 धावा (35 सामने)- रोहित शर्मा (भारत)
897 धावा (35 सामने)- तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका)
विराट सरासरीमध्येही टी20 विश्वचषकात सर्वांच्या वरचढ
विराटची टी20 विश्वचषकातील सरासरी शानदार आहे. तो याबाबतीत सर्वांच्या वरचढ आहे. विराटने आतापर्यंत खेळलेल्या 23 सामन्यांमध्ये 89.90च्या सरासरीने 989 धावा चोपल्या आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन हा आहे, ज्याची सरासरी 88.33इतकी राहिली होती.
टी20 विश्वचषकात सर्वाधिक सरासरी असणारे खेळाडू
89.90 सरासरी- विराट कोहली (भारत)*
88.33 सरासरी- मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया)
86.50 सरासरी- जस्टीन कॅम्प (दक्षिण आफ्रिका)
73.00 सरासरी- मार्कस स्टॉयनिस (ऑस्ट्रेलिया)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडच्या ताफ्यात धाकड फलंदाजाची एंट्री! सुपर 12च्या पहिल्या ग्रुपमध्ये संघांचे वाजणार बारा
अफलातून! 19 वर्षीय चार्लीने घेतला अविश्वसनीय कॅच, पाहून तुम्हीही तोंडात घालाल बोटे