भारतीय संघाच्या दिग्गज माजी कर्णधारांमध्ये विराट कोहली याच्या नावाचाही समावेश होतो. विराटने भारताला अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे, कर्णधाराव्यतिरिक्त विराटने फलंदाज म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये आपला डंका वाजवला आहे. मात्र, सध्या विराटच्या बॅटमधून कसोटी क्रिकेटमध्ये जास्त धावाच निघत नाहीयेत. विराटने शेवटचे कसोटी शतक हे नोव्हेंबर 2019मध्ये बांगलादेशविरुद्ध ठोकले होते. त्यानंतर 2020-21 आणि 2022मध्ये त्याची सरासरी 30हून कमी राहिली आहे. विराट टी20 आणि वनडे क्रिकेटमध्ये लयीत परतला आहे. मात्र, कसोटीत तो चमकेल अशी आशा चाहत्यांनी व्यक्त केली होती, पण तो नागपूर आणि दिल्ली कसोटीतील 3 डावात 12, 44 आणि 20 धावाच करू शकला. आता तो त्याच्या फॉर्ममुळे चिंतेत असेल, पण तो सुरुवातीच्या काळात तो यापेक्षा जास्त चिंतेत असायचा.
मैदानावर अनेकदा आक्रमक दिसणारा विराट कोहली (Virat Kohli) खूपच भावनिकही आहे. छोट्याश्या अपयशानेही त्याला वाईट वाटते. मैदानावर शेवटपर्यंत टिकून टिच्चून फलंदाजी करणारा विराट संघातून बाहेर काढल्याचे ऐकून ढसाढसा रडला होता. त्याला रात्रभर झोप लागली नव्हती. याचा खुलासा विराटसोबत अंडर-19 क्रिकेट खेळलेल्या प्रदीप सांगवान (Pradeep Sangwan) याने केला आहे. 2008मध्ये भारतीय संघाने विराटच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. सांगवान या संघातील महत्त्वाचा वेगवान गोलंदाज होता.
प्रशिक्षकाने केलेले भाष्य
प्रदीप सांगवान याने एका मुलाखतीत सांगितले की, “विराट जेव्हा काही सामन्यात धावा करत नसायचा, तेव्हा चिंतेत असायचा. अंडर-17 क्रिकेटदरम्यान एक-दोन सामन्यात विराटच्या बॅटमधून धावा निघाल्या नव्हत्या, तेव्हा प्रशिक्षक अजित सिंग म्हणाले होते, चला चीकूची मजा घेऊया.”
पुढे सांगताना तो म्हणाला की, “प्रशिक्षकाने पुढच्या संघाची घोषणा केली, तेव्हा त्यात विराट कोहलीचे नाव नव्हते. त्यावेळी तो खूपच नाराज होता आणि खोलीत जाऊन वाईटरीत्या रडू लागला होता. त्याने त्याचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना फोन केला आणि म्हणाला, ‘मी हंगामात 200-250 धावांची खेळी खेळली आहे आणि फक्त 2 सामन्यांमुळे मला बाहेर बसवत आहेत.'” सांगवानने सांगितल्यानुसार, “त्यावेळी विराटला जागताना पाहून मी म्हणालो की, झोपून जा. मात्र, विराट म्हणाला की, ‘जर मी उद्या खेळणारच नाहीये, तर लवकर झोपून काय करायचं.’ त्यानंतर मी विराटला म्हणालो की, तू उद्या सामना खेळणार आहेस. सर्वजण तुझी थट्टा करत होते.”
विराट कोहलीची कारकीर्द
विराट कोहली याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 106 कसोटी सामने, 271 वनडे सामने आणि 115 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. विराटने कसोटीत 8195 धावा, वनडेत 12809 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 4008 धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 74 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. (former skipper virat kohli started crying after hearing about being dropped from the team could not sleep all night)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चालू सामन्यात गोलंदाजाला मारण्यासाठी धावला बाबर आझम; ऍक्शन कॅमेऱ्यात कैद, डिलीट होण्यापूर्वी पाहा व्हिडिओ
राहुलवर जोरदार टीका होत असतानाच मिळाला विंडीजच्या दिग्गजांचा भक्कम पाठिंबा; म्हणाले, ‘एक हजार पटीने…’
आधीच खराब फॉर्म, त्यात दुखापतीमुळे दौऱ्यातूनही बाहेर; वॉर्नरने इंस्टावर मनातलं सगळंच दु:ख टाकलं सांगून