क्रिकेट जगताला धक्का देणारे वृत्त सध्या समोर येत आहे. झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक हिथ स्ट्रिकवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बंदी घातली आहे. आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याचे पाच आरोप त्याने मान्य केले आहेत. त्यामुळे आता त्याला तब्बल 8 वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागणार आहे.
झिम्बाब्वेच्या महान गोलंदाजांपैकी एक असणारा हिथ स्ट्रिक 2017 ते 2018 दरम्यान झालेल्या अनेक सामन्यांमध्ये संशयाच्या भोवऱ्यात अडकला होता. या सामन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आयपीएल, बांगलादेश प्रीमियर लीग आणि अफगाणिस्तान प्रीमियर लीग सामन्यांचा समावेश आहे. प्रशिक्षक म्हणून त्याच्यावर अनेक भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप होते.
आयसीसीने त्याच्यावर 5 आरोप लावले आहेत. त्यातील पहिला आरोप 2.3.2 कलमनुसार असा की त्याने संघांची आतील माहिती बाहेर पोहचवली. यात 2018 सालची झिम्बाब्वे, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील तिरंगी मालिका, झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान 2018 सालची मालिका, आयपीएल 2018 आणि अफगाणिस्तान प्रीमीयर लीग (एपीएल) 2018 या स्पर्धांचा समावेश आहे.
तसेच त्याच्यावर दुसरा आरोप 2.3.3 कमलनुसार असा आहे की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष एखाद्याला नियमांचा भंग करण्यासाठी प्रोत्साहित करणे. त्याने 4 विविध खेळाडूंना सट्टेबाजीच्या हेतूने अंतर्गत माहिती पुरविण्यासाठी प्रोत्साहित केले. या 4 खेळाडूंमध्ये एका राष्ट्रीय संघाच्या कर्णधाराचाही समावेश होता.
आयसीसीने त्यावर तिसरा आरोप 2.4.2 कलमनुसार लावला आहे. हा आरोप लावण्याचे कारण म्हणजे नियमाचा भंग करण्यासाठी त्याला मिळालेल्या भेटवस्तूबद्दल, पैशाबद्दल किंवा कोणत्याही फायद्याबद्दल त्याने आयसीसीला माहिती पुरवण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर कलम 2.4.4 नुसार त्याच्यावर चौथा आरोप लावण्यात आला आहे की बीपीएल 2017, पाकिस्तान सुपर लीग 2018 , आयपीएल 2018 आणि एपीएल 2018 आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याची कोणतीही माहिती पुरवण्यासही त्याने अक्षमता दाखवली आहे.
आयसीसीने हिथ स्ट्रिकवर चौकशीमध्ये अडथळा आणण्याचा किंवा उशीर करण्याचा प्रयत्न किंवा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याचा पाचवा आरोप 2.4.7 नियमानुसार केला आहे.
हे सर्व आरोप हिथ स्ट्रिकने मान्य केले असून आता त्याच्यावर 28 मार्च 2029 पर्यंत बंदी असेल. त्यानंतरच तो पुन्हा क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारे सक्रिय होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
पड्डीकलचे पुनरागमन तर विलियम्सनची अनुपस्थिती, ‘अशी’ असेल RCB आणि SRH ची प्लेइंग इलेव्हन?
गोलंदाजी करताना रोहितचा पाय मुरगळला अन् पत्नी रितीका काळजीने झाली अस्वस्थ, बघा तो क्षण
‘या’ खेळाडूची निवड करुन मुंबई इंडियन्सने मोठी चुक केली, माजी दिग्गजाचे धक्कादायक वक्तव्य