कसोटी हा प्रकार गोलंदाज आणि फलंदाज या दोघांचाही कस पाहणारा आहे. पाच दिवसांचा दिर्घ कालावधी, दोन डाव आणि दिवस उजाडल्यापासून ते दिवस मावळेपर्यंत मैदानावर तग धरुन राहणे, हे तसे अतिशय कठीण काम असते. त्यातही पाच दिवस फलंदाजीपेक्षाही सातत्याने उभय संघातील गोलंदाज अनेक षटके गोलंदाजी करत असतात, ही अतिशय कौशल्याची आणि कौतुकाची बाब असते.
“कोणताही गोलंदाज आपल्या षटकात कमीत कमी धावा जातील, यासाठी स्वतःचे सर्व कौशल्य पणाला लावत असतो. तर, दुसरीकडे गोलंदाजांच्या या स्वप्नाला फलंदाज नेहमीच सुरुंग लावण्याचे काम करत असतात.”
कसोटीमध्ये फलंदाज नेहमीच सावधपूर्ण खेळी करत असतात. त्यांच्याकडे मोठा कालावधी असल्याने ते आपली विकेट संभाळून खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळेच सुनिल गावसकर, राहुल द्रविड यांसारखे खेळाडू एक-एक, दोन-दोन दिवस मैदानावर ठाण मांडून राहत असत.
याउलट संघाला कमीतकमी धावसंख्येत अधिक विकेट मिळवून देणे, यासाठी गोलंदाज प्रयत्नशील असतात. ज्याप्रमाणे कसोटीत अनेक फलंदाजांनी अधिक काळ खेळपट्टीवर टिकुन राहून धावांचे डोंगर उभारले आहेत. तसेच गोलंदाजांनी देखील अफलातून गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडले आहेत.
“कसोटी सामन्यांमध्ये फलंदाज सहसा अधिक आक्रमकपणे फलंदाजी करत नाहीत. त्यामुळे गोलंदाजांची इकॉनॉमी चांगली राहते. परंतु, काहीवेळा गोलंदाजांनी गमावलेला सुर आणि फलंदाजांनी स्विकारलेले आक्रमक धोरण, यांमुळे धावांचा रतीब पडतो.”
या लेखात आपण कसोटीतील असे चार गोलंदाज पाहणार आहोत. ज्यांना त्यांच्या एका षटकात फलंदाजांनी अक्षरशः धू धू धुतले असून अधिक धावा प्राप्त केल्या आहेत.
कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा देणारे चार गोलंदाज :
क्रमांक – 4
- हरभजन सिंग (भारत)
एका षटकात 27 धावा
हरभजन सिंग हा भारतातकडून कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, एका सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज शाहीद आफ्रिदीने हरभजन सिंगच्या एकाच षटकात भरपूर धावा केल्या होत्या.
लाहोर येथे 2005-06 साली झालेल्या या एका सामन्यात हरभजनच्या एका षटकात शाहीद आफ्रिदीने तब्बल 27 धावा केल्या होत्या. त्यात त्याने हरभजनच्या एका षटकात 4 षटकार लगावले होते. हा सामना पुढे जाऊन अनिर्णित राहिला.
क्रमांक – 3
- जो रुट (इंग्लंड)
एका षटकात 28 धावा
इंग्लंड संघाचा माजी कसोटी कर्णधार जो रुट याचे नाव देखील या यादीत नाव आहे. मागील वर्षी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या एका सामन्यात जो रुट ने एकाच षटकात तब्बल 28 दिल्या होत्या.
दक्षिण आफ्रिका संघाचा फिरकी गोलंदाज केशव महाराज याने तळातील फलंदाज म्हणून मैदानावर उतरल्यानंतर तुफान फलंदाजी केली होती. केशव महाराज याने जो रूट याच्या एका षटकात तेव्हा 28 धावा काढल्या होत्या. त्यात त्याने लागोपाट 3 चौकार आणि 2 षटकार ठोकले होते. मात्र, तो सामना पुढे इंग्लंडने एक डाव आणि 53 धावांनी जिंकला होता.
क्रमांक – 2
- जेम्स ऍंडरसन (इंग्लंड)
एका षटकात 28 धावा
इंग्लंडच्या या दिग्गज गोलंदाजाचे या यादीत नाव पाहून कदाचित सर्वांना आश्चर्य वाटेल. परंतु, एँडरसन याने 2013-14 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एका सामन्यात आपल्या एकाच षटकात तबब्ल 28 धावा दिल्या होत्या.
पर्थ येथे झालेल्या या सामन्यात जेम्स एंडरसनच्या एका षटकात जॉर्ज बेली याने तुफान फलंदाजी केली होती. बेली याने एंडरसनच्या त्या षटकात 3 षटकार आणि 2 चौकार लगावत 28 धावा केल्या होत्या.
क्रमांक – 1
- रॉबिन पिटरसन (दक्षिण आफ्रिका)
एका षटकात 28 धावा
या यादीत पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज रॉबिन पिटरसन हा आहे. 2003-04 मध्ये झालेल्या मालिकेतील एका सामन्यात वेस्ट इंडीज संघाचे पूर्व कर्णधार आणि महान खेळाडू ब्रायन लारा यांनी पिटरसनच्या एका षटकात 28 धावा केल्या होत्या.
रॉबिन पिटरसनच्या त्या षटकात ब्रायन लारा यांनी 2 षटकार आणि 4 चौकारांची बरसात केली होती. परंतु, तो सामना पुढे दक्षिण आफ्रिका संघाने 189 धावांनी आपल्या नावावर केला होता.