येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्व संघांनी जोरदार सरावाला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान काही खेळाडूंनी शेवटच्या क्षणी स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे फ्रँचायझींनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी बीसीसीआयला पत्र देखील लिहिले आहे.
नुकतीच इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिका संपन्न झाली आहे. या मालिकेतील अंतिम कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पार पडणार होता. परंतु सामना सुरू होणाच्या काही तासांपूर्वीच भारतीय खेळाडूंनी कोरोनाची भीती पाहता हा सामना खेळण्यास नकार दिला, ज्यामुळे ईसीबी आणि बीसीसीआयने मिळून हा सामना रद्द करण्याचे ठरवले. त्यानंतर शनिवारी (११ सप्टेंबर) जॉनी बेअरस्टो, ख्रिस वोक्स आणि डेव्हिड मलान यांनी आयपीएल स्पर्धेतून माघार घेत असल्याची माहिती दिली. या प्रकरणाला मँचेस्टर कसोटी सामन्यासोबत देखील जोडले जात आहे.
जॉनी बेअरस्टो सनरायझर्स हैदराबाद, डेव्हिड मलान पंजाब किंग्ज आणि ख्रिस वोक्स दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करत होते. हैदराबाद संघात बेयरस्टोच्या जागी शेरफेन रुदरफोर्ड आणि पंजाब संघात मलानच्या जागी एडम मार्करमला संधी देण्यात आली आहे.
असे असले तरीही, नाराज फ्रँचायझींनी इनसाईड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार फ्रँचायझींनी बोर्डाला पत्र लिहीले आहे. एका फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याने म्हटले की, “गुरुवारी मी खेळाडूंशी संपर्क साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, आम्ही १५ सप्टेंबर रोजी संघासोबत जोडले जाऊ. परंतु शनिवारी आम्हाला कळते की त्यांनी येण्यास नकार दिला आहे.”
अधिकाऱ्याने पुढे म्हटले की, “अधिकारी आणि संघ व्यवस्थापकांना या गोष्टीची चिंता सतावतेय. हे पूर्णपणे अव्यवसायिक आणि कराराच्या विरोधात आहे. याबाबत आम्ही बीसीसीआयला पत्रही लिहिले आहे. आम्हाला माहीत आहे की, खेळाडूंना देखील त्रास होत आहे. ते सतत एका बायो बबलमधून दुसऱ्या बायो बबलमध्ये जात आहेत. ते मानसिकरित्या थकले आहेत, हे आम्हाला माहीत आहे. परंतु त्यांनी देखील आम्हाला समजून घ्यायला हवं. त्यांनी माघार घेतल्यामुळे आमच्यासाठी परिस्थिती हाताळणे कठीण होऊन जाते.”(Franchises upset with last minute pull out by england cricketers)
आयपीएल २०२१ स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर, आतापर्यंत इंग्लंडच्या ६ खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, जोस बटलर यांनी आधीच माघार घेतली होती. आता जॉनी बेअरस्टो,ख्रिस वोक्स आणि डेव्हिड मलान यांनी देखील आता स्पर्धेतून माघार घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वे संघाची अविश्वसनीय कामगिरी, अवघ्या १२ चेंडूंमध्ये जिंकला आंतरराष्ट्रीय टी२० सामना





