ठाणे महानगरपालिकेच्या व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा दि. २५ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत दिवा गावदेवी क्रीडा महोस्तव मैदान, दिवा पूर्व येथे आयोजित करण्यात आली आहे.
दिनांक २५ फेब्रुवारी रोजी ठाणे महानगरपालिकाच्या विद्यमान महापौर सौ. मीनाक्षी शिंदे, आयुक्त संजीव जयस्वाल, उपमहापौर श्री रमाकांत मढवी, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष देवराम भोईर आणि मनपा व जिल्हा असोसिएशनच्या पदाधिकार यांच्या उपस्थितीत सायंकाळी ठीक ६:०० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
ठाणे महानगरपालिकाच्या विद्यमाने घेण्यात येणाऱ्या या महापौर कबड्डी स्पर्धेत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत. या कबड्डी स्पर्धेत पुरुष व महिला दोन्ही विभागात व्यावसायिक संघ सहभागी होणार आहेत. यंदा विशेष म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे पुरुष व महिला असे दोन्ही संघ प्रथमचं ठाणे महापौर कबड्डी स्पर्धेत सहभागी होत आहेत.
या राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात एकूण १८ संघ तर महिला विभागात १५ संघ सहभागी होणार आहेत. सुरुवातीला साखळी सामने त्यानंतर बादफेरी अश्या प्रकारे सामने खेळवण्यात येणार आहेत. दिवा गावदेवी क्रीडा महोस्तव मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेसाठी चार मातीची क्रीडांगणे बनवण्यात येणार असून प्रेक्षकांना बसण्यासाठी सुसज्ज अशी गॅलरी उभारण्यात आली आहे.
स्पर्धेतील अंतिम विजयी पुरुष व महिला संघास प्रत्येकी १,००,००० रुपये. अंतिम उपविजयी पुरुष व महिला संघास प्रत्येकी ७५,००० रुपये. आणि उप उपांत्य विजयी पुरुष व महिला संघास प्रत्येकी ३०,००० रुपये बक्षिस व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच यास्पर्धेत खेळाडूंसाठी वैयक्तिक बक्षिसाचा वर्षांव करण्यात येणार आहे. प्रत्येकी दिवसातील उत्कृष्ट चढाई व पकड करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंस प्रत्येकी २,५०० रुपये बक्षीस असणार आहे. पुरुष व महिला मालिकवीर खेळाडूंस प्रत्येकी २१,००० रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त मालिकेतील उत्कृष्ट डावा कोपरारक्षक, उजवा कोपरारक्षक, डावा मध्यरक्षक, उजवा मध्यरक्षक, साहाय्यक रक्षक, उत्कृष्ट चढाई, पकड आणि उदयोन्मुख खेळाडू अशी तब्बल १६ बक्षिसे देण्यात येणार आहेत.






