---Advertisement---

प्रीमियर लीगसह FSDLची भागीदारी भारतीय फुटबॉलमध्ये भरीव सुधारणा करू शकते – प्रीमियर लीगचा दिग्गज खेळाडू पॉल डिकोव्ह

On: गुरूवार, नोव्हेंबर 17, 2022 11:17 PM
Football
---Advertisement---

गेल्या पाच वर्षांत भारतीय फुटबॉलच्या वाढीमुळे मी प्रभावित झालो आहे. फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडच्या (FSDL) प्रीमियर लीगसोबत भागीदारीने भारतातील खेळाच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे मत प्रीमियर लीगचा दिग्गज आणि स्कॉटलंडचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू पॉल डिकोव्ह याने व्यक्त केले आहे. मँचेस्टर सिटी, आर्सेनल आणि लीसेस्टर सिटीसह अनेक क्लबचे प्रतिनिधित्व त्याने केले आहे.

प्रीमियर लीगच्या ३० वर्षांच्या ‘PL30’ सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून डिकोव्ह भारतात आला होता. प्रत्येक वेळी जेव्हा मी भारतात येतो तेव्हा येथील फुटबॉलमधील गुणवत्ता आणि ज्ञान सुधारलेले दिसते. भारतीय फुटबॉलच्या वाढीसाठी एफएसडीएलचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत, असे तो म्हणाला.

”भारतीय फुटबॉलमध्ये होत असलेली सुधारणा तुम्ही स्वतः पाहू शकता. संघासोबत खेळाडूंच्या खेळाचा दर्जा सुधारला आहे. या खेळाडूंसह प्रीमियर लीग एकत्र आली,तर भारतीय फुटबॉल सुधारण्यास आणखी मदत मिळू शकते. मला माहित आहे की, प्रीमियर लीग नेक्स्ट जेन कप येथे खेळवण्याचा विचार करत आहे, जे खूप चांगले आहे. कारण ते आजूबाजूच्या तरुण खेळाडूंनाही आंतरराष्ट्रीय अनुभव देणार आहे. हे सर्व फुटबॉलच्या प्रगतीसाठी पोषक आहे. जितकी प्रगती होईल तितका भारतीय फुटबॉलचा स्तर उंचावेल,” असे तो म्हणाला.

एफएसडीएलच-प्रीमियर लीग सहकार्याने खेळाच्या वाढीसाठी भारतात विविध उपक्रम सुरू केले आहेत. यामध्ये प्रशिक्षक, रेफरी तसेच खेळाडूंसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांचा समावेश आहे. या वर्षी जूनमध्ये, इंग्लंडमध्ये नेक्स्ट जेन कप २०२२चे आयोजन केले होते, ज्यामध्ये हिरो आयएसएल क्लब बंगळुरू एफसी आणि केरळा ब्लास्टर्स एफसीच्या युवा संघांनी अव्वल इंग्लिश क्लब्सच्या अकादमी विरुद्ध सामने खेळले होते. ते आपापल्या गटामध्ये चौथ्या स्थानावर राहिले होते.

फुटबॉल स्पर्धांसाठी मँचेस्टर सिटीचा प्रतिनिधी म्हणून डिकोव्हने अलिकडच्या वर्षांत अनेक वेळा भारत भेटीला आला आहे. तसेच फुटबॉल एक्स्पर्ट म्हणून भारतीय टेलिव्हिजन स्टुडिओमध्येही त्याने काम केले आहे. डिकोव्हने मुलाखतीत म्हटले की, ”मुंबई सिटी एफसीसोबत मँचेस्टर सिटीच्या कोलॅबोरेशनच्यावेळी येथे भारतातील प्रीमियर लीगच्या उत्कटतेची जाणीव झाली. भारतातील फुटबॉल चाहते नेहमीच माहितीगार आहेत आणि फुटबॉलच्या गुणवत्तेवर प्रभाव टाकण्यात ते मोठी भूमिका बजावतात. खेळाडूंवर चाहत्यांचा खूप मोठा प्रभाव असतो. जेव्हा गोष्टी चांगल्या प्रकारे चालू असतात तेव्हा चाहत्यांसाठी समर्थन करणे सोपे असते, परंतु जेव्हा गोष्टी चांगल्या नसतात तेव्हा चाहते खरोखरच तुमच्यावर नाराज असतात. काही लोकांना वाटते की आजकाल खेळाडू चाहत्यांची दखल घेत नाहीत, पण मी तुम्हाला खात्री देतो की ते दखल घेत असतात. ते पाठिंब्याचे कौतुक करतात.”

दोन वर्षांनंतर हिरो आयएसएलच्या या मोसमात चाहत्यांचे पुनरागमन झाले आहे. या हंगामातील आतापर्यंतच्या सरासरी गर्दीच्या संख्येने हिरो आयएसएलला आशियातील सर्वाधिक पाहिलेल्या लीगमध्ये स्थान दिले आहे. सहाव्या आठवड्यानंतर गतविजेता हैदराबाद एफसी १६ गुणांसह आघाडीवर आहे, मुंबई सिटी एफसी दुसऱ्या स्थानावर आहे. नवीन वीकेंड वेळापत्रक सुरू झाल्यामुळे संघांनी आठवड्या-दर-आठवड्यात त्यांच्या कामगिरीचा आलेख चढा ठेवलेला दिसतो. या मोसमात आतापर्यंत ८४ गोल झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---