वेस्ट इंडीजच्या महान अष्टपैलू क्रिकेटपटू गॅरी सोबर्स यांनी क्रिकेट खेळताना अनेक विक्रम केले. आजच्याच दिवशी (२८ मार्च) बरोबर ५८ वर्षांपूर्वी त्यांनी गोलंदाजी करताना कमाल केली होती. त्यांनी ५ चेंडूत ५ विकेट्स घेतल्या होत्या.
साल १९६४ ला इडब्ल्यू जीम स्वान्टॉन यांचा संघ पूर्वेचा आणि भारताचा दौरा करण्यासाठी आला होता. स्वान्टॉन इलेव्हन (Swanton’s XI) संघात दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. यात रिची बेनॉड, सीमॉर नर्स, टायगर पतौडी, सोनी रामदिन, रिचर्ड हटन, गॅरी सोबर्स, केन टेलर, डॅन पायचॉड अशा खेळाडूंचा समावेश होता.
त्यांनी क्वाललंपुर, मलेशिया येथे जाण्यापूर्वी पेनांग आणि सिंगापूर येथे काही सामने खेळले होते. त्यानंतर ते क्वाललंपुर येथे गेले होते. तिथे त्यांचा दुसरा सामना यजमान मलेशिया विरुद्ध होणार होता. त्याआधीचा सेलेग्नॉर संघाविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला होता.
मलेशिया विरुद्धच्या सामन्यात स्वान्टॉन इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी केली. त्यांच्याकडून फलंदाजी करताना नर्स आणि टेलरने ६८ धावांची सलामी भागीदारी केली होती. पण ऍलेक्स डेलीकनने नर्स यांना बाद केल्याने सोबर्स फलंदाजीसाठी आले. पण त्यांना खास काही करता आले नाही. ते पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाले.
त्यानंतर माईक ग्रिफीथ आणि पायचॉड यांनी ९ व्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी करत संघाला २११ धावसंख्या उभारुन दिली.
त्यानंतर मलेशियाकडून सलामीला स्टिव्ह हॉटन आणि रणजीत सिंग हे फलंदाजीसाठी मैदानात उतरले. तर पहिले षटक टाकण्यासाठी सोबर्स यांच्याकडे चेंडू सोपवण्यात आला. पहिल्या तीन चेंडूवर धावा निघाल्या नाहीत.
पण चौथ्या चेंडूवर हॉटन झेलबाद झाले. त्यांचा झेल कॉलिन इंग्लेबी मॅकन्झीने घेतला. तर पुढच्या चेंडूवर एम सिडेक पायचीत झाले. त्याच्याच पुढच्या चेंडूवर माईक शेफर्डसन झेलबाद झाले. त्यांचाही झेल मॅकन्झीने घेतला त्यामुळे सोबर्स यांच्या नावावर हॅट्रिक नोंदवली गेली.
त्यानंतर हटन यांनी दुसरे षटक टाकताना ३ धावा दिल्या. पुन्हा तिसरे षटक टाकण्यासाठी सोबर्स आले. त्यांनी या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जॉन मार्टेन्सला बाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर गुरुचरण सिंग त्रिफळाचीत झाले. त्यामुळे सोबर्स यांचे ५ चेंडूत ५ विकेट्स झाल्या.
त्या डावात सोबर्स यांचे ४ षटके, ३ निर्धाव, २ धावा, आणि ५ विकेट्स असे गोलंदाजी प्रदर्शन होते. त्या डावात रामदिननेही चांगली गोलंदाजी करताना ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे मलेशियाचा पहिला डाव १०८ धावांवरच संपला. त्यांच्याकडून केवळ रणजीत सिंगने सर्वाधिक ५६ धावा केल्या.
त्यानंतर स्वान्टॉन इलेव्हन संघाने दुसऱ्या डावात नर्स यांनी केलेल्या ४० धावांच्या जोरावर १३० धावा केल्या. या डावातही सोबर्स यांना मोठ्या धावा करण्यात अपयश आले. स्वान्टॉन इलेव्हन संघाने मलेशियाला पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीमुळे २३४ धावांचे आव्हान दिले.
या आव्हानाचा मलेशिया पाठलाग करत असताना सोबर्स यांनी पुन्हा एकदा हॉटनला बाद केले. या डावात त्यांना केवळ ही १ विकेट घेता आली. पण पायचॉड यांनी १२ धावांत ५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे मलेशियाचा दुसरा डाव १०३ धावांवर संपुष्टात आला. त्यांना १३० धावांनी पराभव स्विकारावा लागला.
वाचा –
भारतीय क्रिकेटचे पहिले विक्रमादित्य ‘पॉली उम्रीगर’, कर्णधारपद सोडले पण निर्णय नाही बदलला!