न्यूझीलंड २०१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा बदला घेणार का? वाचा काय म्हणाले मुख्य प्रशिक्षक
आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील सुपर -१२ फेरीतील सामने संपले असून, बुधवारपासून उपांत्य फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. उपांत्य फेरीतील सामन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. विश्वचषक २०१९ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात न्यूझीलंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता अबुधाबीच्या मैदानावर हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी झुंज देणार आहेत.
विश्वचषक २०१९ स्पर्धेत न्यूझीलंडचा जो संघ होता, त्या संघातील ८ खेळाडू टी २० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. अशातच न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी मोठे वक्तव्य केले आहे.
गॅरी स्टीड यांनी म्हटले की, “मी इथे २०१९ विश्वचषक स्पर्धेच्या कुठल्याही गोष्टी ऐकल्या नाहीत. माझ्यामते संघातील खेळाडू इंग्लंड संघाविरुद्ध सामना करण्यासाठी तयार आहेत. जसं की मी म्हटलं की, इंग्लंड एक सर्वोत्कृष्ट संघ आहे. आम्ही सर्वश्रेष्ठ संघाविरुद्ध खेळण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतोय.”
तसेच इंग्लंड संघाचा मुख्य फलंदाज जेसन रॉय दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. याबाबत बोलताना स्टीड म्हणाले की, “तो खरचं एक चांगला खेळाडू आहे. त्यामुळे अशा खेळाडूला आपण संघाबाहेर पाहू शकत नाही. आम्हाला देखील लॉकी फर्ग्युसनच्या रुपात मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आम्हाला ही माहीत आहे की, चांगला खेळाडू संघाबाहेर गेल्यानंतर कसं वाटतं. मला विश्वास आहे की, जॉनी बेअरस्टो वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येईल आणि इंग्लंडकडे चांगले खेळाडू आहेत, जे जबाबदारी घेऊन खेळू शकतात.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “मला माझ्या संघाचा खूप अभिमान आहे. लढण्याचे मार्ग शोधणे आणि प्रत्येक गोष्टीशी जुळवून घेणं हे त्यांना चांगलंच जमतं. या संघातील अनेक खेळाडू कौतुकास पात्र आहेत. हे खेळाडू खूप अनुभवी आहेत आणि त्यांना एकमेकांचा खेळ चांगलाच माहीत आहे. एक संघ म्हणून आम्ही कठोर संघर्ष करतो.”