मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक बनणार आहे. नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान त्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर गंभीरनं उघडपणे बोलणं टाळलं.
42 वर्षीय गौतम गंभीर म्हणाला, “मी एवढ्या पुढचा विचार करत नाही. तुम्ही मला त्रास देत आहात. तुम्ही मला सगळे अवघड प्रश्न विचारता. सध्या या प्रश्नाचं उत्तर देणं माझ्यासाठी अवघड आहे. पण ही जबाबदारी मला मिळाली तर ती माझ्यासाठी आनंदाची बाब असेल.” नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. गंभीर या संघाचा मेंटॉर होता. केकेआरच्या यशानंतर तो आता भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याची शक्यता बळावली आहे.
प्रशिक्षक म्हणून वैयक्तिक खेळाडूंपेक्षा संघात सुधारणा करण्यावर भर देणार असल्याचं गंभीरनं यावेळी सांगितलं. गंभीर म्हणाला, “जर तुम्ही एका खेळाडूऐवजी संपूर्ण संघावर लक्ष केंद्रित केलं तर एक दिवस गोष्टी चांगल्या होतील. परंतु जर तुम्ही फक्त एका खेळाडूवर लक्ष केंद्रित केलं, तर तुमच्या संघाला संघर्ष करावा लागेल.”
यावेळी बोलताना गंभीरनं 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची आठवण काढली. या सामन्यात त्यानं सर्वाधिक 97 धावा केल्या होत्या. मात्र या सामन्यात तो अखेरपर्यंत खेळू शकला नाही. याचा मला पश्चाताप असल्याचं गंभीरनं म्हटलं आहे. गौतम गंभीर म्हणाला, “सामना संपवण्याची जबाबदारी माझी होती. हा भार दुसऱ्याच्या खांद्यावर टाकण्यापेक्षा ती जबाबदारी मी पूर्ण करायला हवी होती. ही संधी पुन्हा मिळाली तर मला शेवटच्या धावेपर्यंत खेळायला आवडेल”, असं गंभीरनं यावेळी नमूद केलं.
महत्त्वाच्या बातम्या –
निकोलस पूरननं मोडला ‘युनिव्हर्स बॉस’चा 12 वर्ष जुना रेकॉर्ड! अशी कामगिरी करणारा इतिहासातील पहिलाच खेळाडू
टी20 विश्वचषकात दिसली अमेरिकन पॉवर! कर्णधारानं हाणला 101 मीटर उत्तुंग षटकार; VIDEO व्हायरल
दक्षिण आफ्रिकेचं सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं! इंग्लंडवर बाहेर पडण्याचा धोका