कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीर एबी डिव्हिलियर्सवर चांगलाच चिडला आहे. एबी डिव्हिलियर्सनं आयपीएलमध्ये आपल्या संघासाठी काय केलं, असा प्रश्न गौतम गंभीरनं उपस्थित केलाय. एबी डिव्हिलियर्सनं अलीकडेच हार्दिक पांड्यावर बोचरी टीका केली होती. या मुद्द्यावरून गौतम गंभीरनं एबी डिव्हिलियर्सवर निशाणा साधला आहे.
गौतम गंभीर म्हणाला की, “मला वाटत नाही एबीनं (एबी डिव्हिलियर्स) कधीही आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवलंय. त्यानं धावा काढण्याव्यतिरिक्त आयपीएलमध्ये काय मिळवलंय?” गंभीर म्हणाला की, डिव्हिलियर्सनं संघाच्या दृष्टिकोनातूनही कोणतीही मोठी कामगिरी केलेली नाही. तो म्हणाला की, कोणताही खेळाडू त्याच्या संघाइतकाच चांगला असतो. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याला वारंवार लक्ष्य करणं योग्य नाही.”
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर बरीच टीका केली होती. एबीनं हार्दिकच्या नेतृत्व शैलीवरही प्रश्न उपस्थित केले होते. एबी डिव्हिलियर्सच्या म्हणण्यानुसार, हार्दिक पांड्याचं कर्णधारपद अहंकारानं ग्रस्त असून त्याची शांत शैली खरी वाटत नाही. एवढंच काय तर, संघातील इतर अनुभवी खेळाडू देखील त्याचा खोटेपणा स्वीकारू शकत नाहीये.”
एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी दीर्घकाळ खेळला आहे. त्यानं आरसीबीसाठी एकूण 184 सामने खेळले, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 5162 धावा निघाल्या आहेत. या कालावधीत त्यानं 40 अर्धशतकं आणि 3 शतकंही झळकावली आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 152 च्या आसपास राहिला.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची कामगिरी फारच खराब राहिली आहे. या हंगामाच्या सुरुवातीला मुंबईनं 5 वेळचा चॅम्पियन रोहित शर्माला हटवून हार्दिकला कर्णधार केलं होतं. मात्र त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून सर्वात आधी बाहेर पडली. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, रोहितकडून कर्णधारपद काढून घेण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनाही आवडलेला नाही. चाहत्यांनी प्रत्येक सामन्यात पांड्याची खिल्ली उडवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
18 मे शी विराट कोहलीचं जुनं नातं, या दिवशी चेन्नईचा बँड वाजणार हे निश्चित!
पावसामुळे सामना रद्द, चाहत्यांचे पैसे मिळणार परत; गुजरात टायटन्स संघाची घोषणा