अष्टपैलू हार्दिक पांड्याला टी२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संधी मिळणार की नाही यावर गूढ कायम आहे. २०१९ मध्ये पाठीच्या खालच्या भागाला झालेल्या दुखापतीपासून हार्दिकच्या फॉर्मवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. टी२० विश्वचषकापूर्वी सराव सामन्यातही त्याने गोलंदाजी केलेली नाही.
दरम्यान, भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि २००७ च्या टी -२० विश्वविजेत्या संघाचा सदस्य गौतम गंभीर याने पांड्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याबाबत एक अट घातली आहे. त्याने म्हटले आहे की पांड्या गोलंदाजी करणार असेल तरच त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान द्यावे.
एका वृत्तपत्रात लिहिताना गंभीरने भारतीय संघाचे मूल्यांकन केले आहे. हार्दिक पांड्याचा उल्लेख करत त्याने लिहिले, ‘नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये पांड्याच्या गोलंदाजी न केल्यामुळे, निवड समितीने फिरकी गोलंदाज अक्षर पटेलऐवजी अष्टपैलू शार्दुल ठाकूरचा संघात समावेश केला. पांड्याने त्याच्या कोट्यातली पूर्ण गोलंदाजी करावी अशी माझी इच्छा आहे. जर तंदुरुस्तीची समस्या नसेल, तर तो संघाला तो चांगला समतोल देऊ शकतो. पण जर त्याने गोलंदाजी केली नाही तर मी त्याला माझ्या संघात ठेवणार नाही.’
गंभीर २००७ च्या टी२० विश्वचषकाचा उल्लेख करताना म्हणाला की दोन्ही संघांमध्ये समानता आहे. त्या वेळीही कर्णधारासह अनेक खेळाडू संघात त्यांच्या जागेला पक्के करण्यात गुंतले होते आणि आजही तेच घडत आहे.
त्याने लिहिले, ‘विराटने विश्वचषकानंतर टी२० कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. केएल राहुल सलामीसाठी स्वतःला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांना हार्दिकला एक यशस्वी अष्टपैलू म्हणून बघायचे आहे. पण आतापर्यंत तसे झालेले नाही. सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि वरुण चक्रवर्ती अजूनही त्यांच्या सुरुवातीच्या अवस्थेत आहेत. धोनी पहिल्यांदाच मार्गदर्शक म्हणून संघाशी जोडला गेला आहे. वर्ष २००७ प्रमाणे, यावेळी देखील खेळाडूंचे स्वतःचे ध्येय आहे.’
यावेळी आयपीएल दरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला होता की हार्दिक पांड्या येत्या काही आठवड्यांत गोलंदाजीला सुरुवात करेल. यावेळी आयपीएलमध्ये हार्दिकने १२ सामन्यात फक्त १२७ धावा केल्या होत्या. अलीकडेच मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी म्हटले होते की, जर हार्दिकवर जास्त दबाव आणला गेला, तर त्याच्या फलंदाजीवर परिणाम होऊ शकतो. आतापर्यंत कर्णधार किंवा संघ व्यवस्थापनाने त्याच्या गोलंदाजीबद्दल काहीही सांगितले नाही.
टी२० विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एकट्या विराटची कामगिरी पाकिस्तानला घाम फोडण्यासाठी पुरेशी, पाहा ‘रनमशीन’ची जबरदस्त आकडेवारी
पाकिस्तानविरुद्ध रोहितची कामगिरी आहे चिंताजनक, टी२० क्रिकेटमध्ये १०० धावाही आल्या नाही करता






