भारतीय पुरूष वरिष्ठ संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या कार्यकाळात संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५, आशिया कप २०२५ आणि आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ या तीन मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याच्या कार्यकाळात भारताने मर्यादित षटकांमध्ये चांगली कामगिरी करत असल्याचे दिसत असताना कसोटीमध्ये मात्र वेगळेच चित्र आहे. कसोटीमध्ये संघाच्या खालावलेल्या निकालांमुळे गंभीरच्या पदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
गंभीरच्या कार्यकाळातच विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन अनुभवी खेळाडूंनी कसोटीतून निवृत्ती घेतली. तसेच संघामध्ये अनेक बदलही दिसले आहेत, यामुळे त्याच्यावर टीकाही झाल्या आहेत. यामध्ये मात्र त्याची पाठराखण त्याच्या संघसहकाऱ्याने केली आहे. मुनाफ पटेलच्या मते गंभीर एक प्रामाणिक व्यक्ती असल्याने अनेक लोकांना तो आवडत नाही.
“गंभीरसारख्या मुख्य प्रशिक्षकाला हटवले, तर खेळाडूंना सांभाळणे कठीण होईल. तो एक प्रामाणिक व्यक्ती आहेत. तो जे सत्य आहे तेच स्पष्टपणे बोलतो आणि बऱ्याच लोकांना ते आवडत नाही”, असे मुनाफने बॉम्बे स्पोर्ट एक्सचेंज पॉडकास्टवर म्हटले आहे.
संघात नियंत्रण राखण्यासाठी गंभीरची उपस्थिती महत्वाची असे भारताच्या २०११ विश्वविजेत्या संघाचा
भाग असलेल्या मुनाफने सांगितले आहे. तो पुढे म्हणाला, “सद्य स्थितीत खेळाडूंना गंभीरच सांभाळत आहे. त्याच्याशिवाय इतर प्रशिक्षक खेळाडूंना तसे सांभाळणार नाहीत, कारण आजही त्याची दहशत आहे. त्याचे क्रिकेटवर प्रेम आहे, पैशांवर नाही. तो तुम्हाला पैशांसाठी कधी भांडताना दिसणार नाही, तो कधी तसा नव्हताही.”
“जर गंभीरने पद सोडले तर गोष्टी आणखी बिघडतील. संघात प्रशिक्षकाचे नियंत्रण असले पाहिजे, तो मित्र बनू शकत नाही. विचार करा, तो हे काम करताना किती शत्रू निर्माण करत आहे. समालोचन पॅनेलमधील १० पैकी ८ जण त्याच्या विरोधात आहेत. ५ पैकी ४ निवडकर्ते त्याच्या विरोधात असतील, तरीही तो आपले काम करतो”, असेही मुनाफने पुढे म्हटले आहे.
गंभीरने जुलै २०२४ मध्ये संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी हाती घेतली. त्याच्या कार्यकाळाला एक वर्षाहून अधिक काळ गेल्यानंतर आणि २०२४-२५ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावल्यानंतर विराट आणि रोहितने निवृत्ती घेतली होती. तेव्हा त्याच्यावर खूप टीका झाली होती.






