भारत आणि जिम्बाब्वे (India vs Zimbabwe) दोन्ही संघात टी20 मालिका उद्यापासून (23 जुलै) खेळली जाणार आहे. ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer under captaincy team india) नेतृत्वाखालील टीम इंडियासमोर विजयाचे खाते उघडण्याचे आव्हान असणार आहे. टीम इंडिया जवळपास एक महिन्यापासून परदेशी मैदानावर खेळत आहे आणि संघाला सतत अपयशाला सामोरे जावे लागत आहे.
आधी टीम इंडियाला आयर्लंडविरुद्धच्या 2 सामन्यांच्या टी20 मालिकेत 0-2 असा दारूण पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर इंग्लंडच्या मैदानावर 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय संघाला 0-4 असा पराभव पत्करावा लागला. एवढेच नाही तर, 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतही इंग्लंडने भारतीय संघाला 2-1 ने पराभूत केले.
आता टीम इंडियासमोर परदेशी मैदानावर सलग चौथ्या मालिकेतील पराभव टाळण्याचे आव्हान असेल. 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेपूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्ट केले की, संघ आता भूतकाळात जगू इच्छित नाही. त्याच्या मते, खेळाडूंना कोणत्याही भीतीशिवाय मैदानात उतरवावे लागेल, कारण अपयशाची भीतीच कामगिरीवर सगळ्यात मोठा परिणाम करते.
हरारे येथील पहिल्या टी20 सामन्याच्या पूर्वसंध्येला अय्यरने म्हटले की, इंग्लंड दौरा संघासाठी कठीण नक्कीच राहिला, परंतु त्यातून अनेक महत्त्वाचे धडेही मिळाले आहेत. त्याच्या मते, संघास आता हे चांगल्या प्रकारे समजले आहे की, पुढे जाण्यासाठी कोणत्या प्रकारची मानसिकता, परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची क्षमता आणि सामन्यादरम्यान चांगल्या निर्णयांची गरज असेल. हा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचा पहिला परदेशी दौरा होता. पण, अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात संघ अपयशी ठरला.
पण, त्याने आता स्पष्ट केले आहे की, या अनुभवांनी संपूर्ण संघाला आधीपेक्षा अधिक मजबूत आणि एकजुट बनवले आहे. श्रेयस अय्यरने विशेषतः युवा खेळाडूंना आत्मविश्वासाने खेळण्याचा सल्ला दिला. त्याने म्हटले की जर खेळाडू अपयशी होण्याच्या भीतीसह मैदानात उतरले तर ते आपला नैसर्गिक खेळ खेळू शकत नाहीत. तसेच, जेव्हा तुमच्या मनात अपयशाची भीती असते तेव्हा तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी खेळता. पण जेव्हा ही भीती संपते, तेव्हाच तुम्ही पूर्ण क्षमतेने कामगिरी करू शकता. अय्यरने हे देखील सांगितले की संघाने बाह्य टिकेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वर्तमानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
त्याच्या मते, जर खेळाडूंनी एकत्र येऊन चांगला खेळ केला तर परिणाम आपोआप चांगले मिळतील. भारतीय संघ इंग्लंडहून थेट झिम्बाब्वेमध्ये पोहोचला आहे आणि पहिल्या सामन्यापूर्वी त्याला केवळ एक सराव सत्र मिळाले आहे. अय्यरने मान्य केले की इतक्या कमी वेळात नवीन परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेणे सोपे नाही. तसेच, तो म्हणाला आम्ही काल येथे पोहोचलो, आज सराव केला आणि उद्या सामना आहे. हे आव्हानात्मक नक्कीच आहे, परंतु अशा परिस्थितीत चांगली कामगिरी केल्यावर एक वेगळेच समाधान मिळते.
संघात अनेक खेळाडू प्रथमच जिम्बाब्वेमध्ये खेळत आहेत. अशा परिस्थितीत जो संघ लवकर परिस्थिती समजून घेईल, त्याच्या यशस्वी होण्याची शक्यता देखील तितकीच जास्त असेल. भारतीय कर्णधाराने यजमान झिम्बाब्वेचेही कौतुक केले. श्रेयस म्हणाला, हा संघ खूप स्पर्धात्मक आहे आणि त्यांच्या अनेक खेळाडूंना आयपीएल (IPL) खेळण्याचा अनुभव देखील आहे, ज्यामुळे ते सामने अटीतटीचे बनवू शकतात.






