नुकतेच इंग्लंड विरुद्ध भारत तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी (22 जुलै)क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल अव्वल स्थानावर कायम आहे, मात्र इंग्लंडमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या तीन भारतीय फलंदाजांमुळे त्याचे स्थान धोक्यात आले आहे.
भारतीय कर्णधार शुबमन गिलने तीन सामन्यांमध्ये 188 धावा करून अव्वल स्थान गाठण्यासाठी मिचलेपासून केवळ एका रेटिंग पॉइंट्सने दूर आहे. गिलचे रेटिंग पॉइंट्स 802 आहेत. ही मालिका इंग्लंडने 2-1 अशी जिंकली असली तरी, भारताचे अनुभवी स्टार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही क्रमवारीत फायदा झाला आहे.
या क्रमवारीत विराट तिसऱ्या स्थानी असून त्याचे रेटिंग पॉइंट्स 767 आहेत, तर रोहित 758 रेटिंग पॉइंट्ससह चौथ्या स्थानी आहे. तसेच इंग्लंडचा फलंदाज जो रूट पहिल्या दहामध्ये पोहोचला आहे. त्याने भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वाधिक 249 धावा केल्या. याचा त्याला क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. तो चार स्थानांची झेप घेत आठव्या स्थानी पोहोचला आहे. त्याच्या बाकी संघसहकाऱ्यांनाही क्रमवारीत फायदा झाला आहे.
बेन डकेट (11 स्थानांनी वर चढून संयुक्तपणे 19 व्या स्थानावर) आणि जेकब बेथेल (पाच स्थानांनी वर चढून 64 व्या स्थानावर) यांनी वनडे फलंदाजांच्या यादीत प्रगती केली. तसेच वेस्ट इंडिजविरुद्ध लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंडचे मायकल ब्रेसवेल (सहा स्थानांनी वर चढून 54 व्या स्थानावर) आणि मार्क चॅपमन (10 स्थानांनी वर चढून 63 व्या स्थानावर) या दोघांनाही फलंदाजी क्रमवारीत मोठा फायदा झाला.
गोलंदाजी क्रमवारीत अफगाणिस्तानचा राशिद खान अव्वल स्थानावार कायम आहे. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला एका स्थानाचा फायदा झाला आहे. त्याने एका स्थानाची झेप घेत तिसरे स्थान काबीज केले आहे. दुसऱ्या स्थानी पाकिस्तानचा अबरार अहमद आहे. या क्रमवारीच्या पहिल्या दहामध्ये भारताचा एकही खेळाडू नाही. (Shubman Gill, Virat Kohli and Rohit Sharma impressive performances in England race for icc odi batsman ranking top spot)
अष्टपैलूंच्या क्रमवारीमध्ये अफगाणिस्तानचा अझमतुल्लाह ओमरजाई पहिल्या स्थानी, बांगलादेशचा मेहेदी हसन मिराज दुसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडच्या मायकल ब्रेसवेलने वेस्ट इंडिजविरुद्ध चांगली कामगिरी केली, त्यामुळे त्याला या यादीत दोन स्थानांचा फायदा झाला. आता तो तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत भारताचा एक खेळाडू पहिल्या दहामध्ये आहे. अक्षर पटेल नवव्या स्थानी कायम आहे.






