Gautam Gambhir : भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी20 आणि वनडे मालिका खेळली जाणार आहे. (27 जुलै) रोजी दोन्ही संघ पहिल्या टी20 सामन्यासाठी मैदानात उतरणार आहेत. तत्पूर्वी, भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आपली एक योजना अमलात आणण्याचा विचार सुरू केला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मेंटर असताना गंभीर याने वेस्ट इंडिजचा अनुभवी फिरकीपटू सुनील नरेन याला सलामीला फलंदाजीला पाठवत आक्रमक फटकेबाजी करण्याची मुभा दिली होती. त्याचा फायदा संघाला झाला व कोलकाता संघ विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला. आता तोच प्रयोग गंभीर भारतीय संघासोबत देखील करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
श्रीलंकेत पोहोचल्यानंतर भारतीय संघाने तीन सराव सत्रे घेतली. यामध्ये अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर हा अधिक वेळ फलंदाजी करताना दिसला. तसेच त्याने यादरम्यान आक्रमक फटके मारले. मिळत असलेल्या माहितीनुसार, गंभीर हा सुंदर याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवून वेगाने धावा काढण्याची परवानगी देऊ शकतो. टी20 मालिकेत हा प्रयोग केला जाण्याची शक्यता आहे. सध्या भारतीय संघात तो अक्षर पटेल याच्यासह अष्टपैलू आहे. सुंदर हा नरेनप्रमाणे फटकेबाजी करण्यासाठी देखील सक्षम असून, त्याने अनेक वेळा देशांतर्गत क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून भूमिका देखील बजावली आहे. यासोबतच तो कंजूस गोलंदाजी करण्यासाठी देखील ओळखला जातो.
सुंदर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीची छाप वेळोवेळी पाडली आहे. त्याच्या नावे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अर्धशतकांची नोंद असून, मागील वर्षी न्यूझीलंडविरुद्ध रांची टी20 सामन्यात त्याने केवळ 26 चेंडूत अर्धशतक साजरे केले होते.
भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिकेची सुरुवात 27 आणि 28 जुलै रोजी होणाऱ्या सलग दोन सामन्यांनी होणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना 30 जुलै रोजी होणार आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या नव्या जर्सीतील वाढले ‘स्टार’, फोटो पाहून प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान!
IPL Auction 2025; बीसीसीआय आणि आयपीएल मालकांची होणार बैठक
या 2 स्टार्सपैकी कोणाला प्लेइंग 11 मध्ये स्थान? श्रीलंकेमालिकेपूर्वी हेड कोच गंभीरसमोर मोठे आव्हान