भारतीय क्रिकेट संघात सध्या सर्वकाही अलबेल नाही. एकीकडे ऑस्ट्रेलियात टीम इंडियाची अवस्था बिकट झालेली आहे, तर दुसरीकडे संघातही तणावाचं वातावरण असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नुकताच ड्रेसिंग रूममधील एक मोठा वाद उघडकीस आला, ज्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि काही खेळाडूंमध्ये तणावाची परिस्थिती असल्याचं एका अहवालात म्हटलं आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघातील अनेक खेळाडूंमध्ये संवाद आणि समन्वयाचा अभाव असल्याचं यात म्हटलंय. यामुळे आता गौतम गंभीरच्या पदावर टांगती तलवार आहे.
गंभीरच्या आधी राहुल द्रविड आणि रवी शास्त्री हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्या काळात खेळाडूंबाबत असं काही घडलं नव्हतं. त्यामुळे आता गंभीरबाबत अशा गोष्टी समोर आल्यानंतर बोर्डही सतर्क झालं असून, संघाची कामगिरी सुधारली नाही, तर गंभीरवर ॲक्शन घेतल्या जाऊ शकते. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही, तर त्याच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल, असा दावा बीसीसीआयच्या एका सूत्रानं केला आहे.
वृत्तसंस्था पीटीआयच्या हवाल्यानं बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, “बॉर्डर गावस्कर मालिकेत अजून एक कसोटी सामना खेळायचा आहे. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. संघाच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही, तर गौतम गंभीरचं स्थानही सुरक्षित राहणार नाही.”
यानंतर बोर्डाच्या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं की, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीर बीसीसीआयची पहिली पसंत कधीच नव्हता. उलट व्हीव्हीएस लक्ष्मणसारख्या दिग्गजांनी नकार दिल्यानंतर ही तडजोड करण्यात आली होती, असं सूत्रानं सांगितलं. “तो (गौतम गंभीर) कधीही बीसीसीआयची पहिली पसंती नव्हता. काही नावाजलेल्या परदेशी नावांना तिन्ही फॉरमॅटचं प्रशिक्षक व्हायचं नव्हतं. त्यामुळे ही तडजोड करण्यात आली”, असं सूत्रानं सांगितलं.
गौतम गंभीरनं जुलै 2024 मध्ये भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं 9 कसोटी सामने खेळले, ज्यापैकी टीम इंडियानं केवळ 3 सामने जिंकले, तर 5 सामने गमावले. 1 सामना अनिर्णित राहिला. याशिवाय श्रीलंकेतील वनडे मालिकेतही संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
हेही वाचा –
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टीम इंडियासोबत यशस्वी का होत नाहीयेत? 3 प्रमुख कारणं जाणून घ्या
रिषभ पंतच्या बचावासाठी समोर आले संजय मांजरेकर, गावस्करांच्या टीकेला सडेतोड उत्तर!
रिषभ पंत सिडनी कसोटीतून बाहेर होणार? पाचव्या कसोटीत बदलू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11