टी20 विश्वचषक 2024 नंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या पदावरून पायउतार होणार आहेत. यानंतर टीम इंडियाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळेल, ज्याची घोषणा जूनच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. हा नवा मुख्य प्रशिक्षक दुसरा कोणी नसून माजी सलामीवीर गौतम गंभीर आहे!
रिपोर्टनुसार, भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरच्या नावाला मंजुरी देण्यात आली असून बीसीसीआय आणि गंभीर यांच्यात करारही झाला आहे. टी20 विश्वचषकानंतर गंभीरच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल. बीसीसीआयच्या एका सूत्रानं ‘दैनिक जागरण’ला सांगितलं की, “बोर्ड आणि गंभीर यांच्यात चर्चा झाली आहे. तो राहुल द्रविडची जागा घेणार आहे.”
गौतम गंभीरसोबत सपोर्ट स्टाफमध्ये कोण असेल हे येणारा काळच सांगेल. सध्या फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आहेत. गंभीर त्याचा स्वतः सपोर्ट स्टाफ निवडणार आहे. राहुल द्रविडनंही असंच केलं होतं. त्याच्या आधी रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक असताना संजय बांगर हे फलंदाजी प्रशिक्षक, भरत अरुण गोलंदाजी प्रशिक्षक आणि आर श्रीधर हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते.
गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेताच केवळ सपोर्ट स्टाफमध्येच नाही, तर संघातही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. गौतम गंभीरची कोचिंग स्टाईल राहुल द्रविडपेक्षा वेगळी आहे. द्रविड हा संयमी आहे. मात्र गंभीर हा आक्रमक क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देतो.
टीम इंडियाला खेळाडू म्हणून अनेक सामने जिंकवून देणाऱ्या गौतम गंभीरकडे प्रशिक्षक म्हणूनही दांडगा अनुभव आहे. तो आयपीएल 2024 चं विजेतेपद पटकवणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मेंटॉर होता. तसेच याआधीचे दोन हंगाम तो लखनऊ सुपर जायंट्सचा देखील मेंटॉर होता. या दोन्ही हंगामात लखनऊची टीम प्लेऑफमध्ये पोहचली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
फलंदाजीसह दोन्ही हातांनी करतो गोलंदाजी! या अनोख्या खेळाडूची बीसीसीआयनं घेतली दखल
भारताचे दिग्गज फलंदाज अमेरिकेत पूर्णपणे प्लॉप, आकडेवारी पाहून बसेल धक्का!
टी20 विश्वचषकादरम्यान दिग्गज खेळाडूनं घेतली निवृत्ती, दोन देशांकडून खेळला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट