गौतम गंभीरची कारकीर्द माझ्यामुळे संपली, पाकिस्तानच्या गोलंदाजाने केला दावा

भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजामध्ये गणला जातो. भारताने मिळवलेल्या 2007 टी20 विश्वचषक आणि 2011 वनडे विश्वचषक विजयात गंभीरने महत्त्वाचा वाटा उचलला आहे.

पण आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने दावा केला आहे की गंभीरची मर्यादीत षटाकांची कारकीर्द संपण्यामागे त्याची गोलंदाजी महत्त्वाचे कारण आहे.

समा(Samaa)चॅनेलशी बोलताना 7 फूट 1 इंट उंची असणारा इरफान म्हणाला, ‘जेव्हा मी भारताविरुद्ध खेळलो, तेव्हा ते माझ्याविरुद्ध खेळताना संघर्ष करत होते. त्यातील काही जणांनी सांगितले 2012 ला भारतात झालेल्या मालिकेत ते माझ्या उंचीमुळे मी टाकलेला चेंडू निट पाहू शकत नव्हते आणि त्यांना माझ्या चेंडूती गतीही लक्षात येत नव्हती.’

‘गंभीरला सामन्यात किंवा दोन्ही संघांच्या सरावावेळी माझा सामना करणे आवडत नव्हते. मला कायम वाटायचे की तो माझ्या नजरेला नजर मिळवण्याचे टाळतो आहे. मला आठवते मी त्याला 2012 च्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याला 4 वेळा बाद केले होते. त्याला माझ्या विरुद्ध काही करता येत नव्हते.’

‘माझा विश्वास आहे मी त्याची कारकीर्द संपवली. त्याने त्या मालिकेनंतर जास्त सामने खेळले नाही.’

गंभीरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 2012-13 ला झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लंड विरुद्ध शेवटची वनडे मालिका खेळली.

गंभीरने मागीलवर्षी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर त्याने राजकारणात प्रवेश केला असून तो सध्या दिल्लीमध्ये खासदार आहे.

गंभीरने त्याच्या कारकिर्दीत भारताकडून 242 सामने खेळताना 10324 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 20 शतके आणि 63 अर्धशतके केली आहेत.

You might also like

Leave A Reply