न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात खेळपट्टी फलंदाजी करण्यालायक नव्हती, असे अनेकांचे मत आहे. भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या यानेही सामना संपल्यानंतर खेळपट्टीविषयी नाराजी व्यक्त केली. लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी दिग्गज सलामीवीर आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर गौतम गंभीर याने मजेशीर प्रतिक्रिया दिली.
गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या मते लखनऊमधील ही खेळपट्टी पाहून क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेऊ शकतो. गंभीरच्या या प्रतिक्रियेनंतर उपस्थित सर्वजण देखील हसू लागले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान गौतम गंभीर समालोचन करत होता. यावेळी खेळपट्टी पाहून तो म्हणाला, “जर क्विंटन डी कॉकने ही खेळपट्टी पाहिली, तर आयपीएल खेळण्यासाठी न येण्याचीही शक्यता आहे.” यावेळी भारताचा माजी दिग्गज मोहम्मद कैफ देखील समालोचकाच्या भूमिकेत होता आणि तो म्हणाला, “नाही… नाही… तो येणार. तो आयपीएल खेळण्यासाठी नक्कीच येणार.”
क्विंटन डी कॉक आयपीएलमध्ये मागच्या वर्षी नव्याने जोडल्या गेलेल्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मागच्या वर्षी आयपीएलमध्ये लखनऊ संघ केएल राहुलच्या नेतृत्वात अंतिम चार संघांमध्ये पोहोचला होता. संघाच्या या कामगिरीत यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकचे योगदान महत्वाचे राहिले. मागच्या वर्षी डी कॉकने 15 सामन्यांमध्ये 508 धावा केल्या होत्या. गंभीरने यायवेळी बोलताना आगामी आयपीएल हंगामाविषयी काही महत्वाचे संकेतही दिले.
गंभीर पुढे म्हणाला, “या सामन्याकडे पाहून असे वाटत आहे की, अमित मिश्राला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करणे फायद्याचे असू शकते. तो आगामी हंगामात लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी खूप योगदान देऊ शकतो.” यावर मोहम्मद कैफ म्हणाला, “लखनऊ संघाची रणनीती मला समजली आहे. संघ आयपीएलमध्ये युवा लेग स्पिनर रवी बिश्नोई आणि अमित मिश्रा यांच्यासोबत उतरेल.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘चहल माझा फलंदाजी प्रशिक्षक आहे…’, सूर्यकुमार यादवचा मजेशीर व्हिडिओ
कट्टर दोस्त क्रिकेटर पुढे जाऊन झाले एकमेकांचे कट्टर दुश्मन, आज पाहत नाहीत एकमेकांचे तोंड





