मुंबई । बांग्लादेश क्रिकेट संघाचा कर्णधार मशरफे मुर्तझा हा सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. कमालीच्या गुणवत्तेचा धनी असलेल्या मशरफेचा गेल्या काही दिवसांपासून फॉर्म हरपला आहे. 2019 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर त्याच्या प्रदर्शनात सातत्य राहिले नाही. संपूर्ण स्पर्धेत अवघा एक बळी टिपला आला. एकेकाळी अष्टपैलू म्हणून छाप सोडलेल्या 36 वर्षीय मशरफेने बांगलादेश क्रिकेट बोर्डावर गंभीर आरोप केले आहेत.
मशरफे मुर्तजा एका वेबसाईटशी बोलताना म्हणाला की, “बांगलादेश क्रिकेट बोर्ड मला सक्तीने निवृत्ती घ्यायला भाग पडत आहे. मला एवढेच माहित आहे की, माझे संपूर्ण जीवन क्रिकेटला बहाल केले आहे. एक दोन मालिकेत खराब कामगिरी झाली की बोर्ड मला निवृत्ती घ्यायला भाग पाडत आहे. इतकेच नव्हे तर मला निरोप देण्यासाठी एका सामन्यचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला.”
तो म्हणाला, “मी प्रामाणिकपणे सांगतो, मला निवृत्ती देण्यासाठी खूप घाई केली जात आहे. हे माझ्यासाठी खूप दुःखद बाब आहे. मला निरोप देण्यासाठी एका विशेष सामन्याच्या आयोजनावर बांगलादेश दोन कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. नैतिक दृष्टीने विचार केला तर हे योग्य नाही. कारण आमच्याकडे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना आजकाल मानधन दिले जात नाही.”
काही दिवसांपूर्वी प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनीही मशरफे मुर्तझा हा त्यांच्या भविष्यकालीन योजनेत बसत नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. मशरफेने बांगलादेश क्रिकेट संघाकडून 36 कसोटी, 220 एकदिवसीय आणि 54 टी-20 सामने खेळला आहे. त्यात अनुक्रमे 78, 270, 42 बळी घेतले आहेत. फलंदाजीतही त्याने चुणूक दाखवत अनुक्रमे 797, 1787, 377 इतक्या धावा केल्या आहेत .