---Advertisement---

टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाची जागा घेणार जॉर्ज बेली; सांभाळणार ही नवी जबाबदारी

On: गुरूवार, नोव्हेंबर 28, 2019 8:00 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी20 संघाचा माजी कर्णधार जॉर्ज बेलीची (George Bailey) बुधवारी (27 नोव्हेंबर) ग्रेग चॅपेलच्या (Greg Chappell) जागी ऑस्ट्रेलियाच्या तीन सदस्यीय राष्ट्रीय निवड समितीत निवडकर्ता म्हणून निवड झाली आहे.

या निवड समीतीमध्ये अध्यक्ष ट्रेवर होन्स (Trevor Hohns) आणि प्रशिक्षक जस्टीन लँगर (Justin Langer) यांचाही समावेश आहे.

“बरीच वर्षे खेळाडू म्हणून योगदान देण्याचे भाग्य मला लाभले आहे. आता निवडकर्त्याच्या भूमिकेत पुढे जाण्याची संधी मिळणे, हा खूप मोठा सन्मान आहे,” असे बेली म्हणाला.

“मला खात्री आहे की मी निवड प्रक्रियेमध्ये आपले योगदान देऊ शकतो आणि माझा अनुभव ट्रेव्हर आणि जस्टिन यांच्यासाठी पूरक असेल,” असेही बेली म्हणाला.

37 वर्षीय बेलीने ऑस्ट्रेलियाकडून 5 कसोटी, 90 वनडे आणि 30 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 3 शतके आणि 25 अर्धशतकांसह 3500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

तसेच बेली तस्मानिया, हॉबर्ट हॅरिकेन्स आणि मेलबर्न स्टार्सकडूनही खेळला आहे. बेलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2012मध्ये श्रीलंकेत खेळलेल्या टी20 विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

“तो एक उत्कृष्ट नेता असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक अत्यंत प्रतिष्ठित, विचारवंत आणि उदार व्यक्तिमत्त्व आहे,” असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय संघाचे प्रमुख बेन ऑलिव्हर (Ben Oliver) म्हणाले.

“सर्व फॉर्मेटमधील त्याचा विस्तृत अनुभव आणि टी20 क्रिकेटचे सखोल ज्ञान आमच्यासाठी पुढीलवर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकात आणि त्यापुढेही अनमोल ठरणार आहे,” असेही ऑलिव्हर म्हणाले.

बेलीने ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार चॅपेलची जागा घेतली असून ते गेल्या 9 वर्षांपासून क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय प्रतिभा व्यवस्थापक होते. तसेच निवडकर्ते होते. पण त्यांनी सप्टेंबरमध्ये पदभार सोडला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---