मुंबई ।गतवर्षी झालेल्या आयपीएलच्या स्पर्धेत आर. अश्विनने जॉस बटलरला मांकडिंग पद्धतीने बाद केल्यानंतर खूपच वाद झाला होता. त्यावेळी अश्विनवर चौफेर टीकेचा भडिमारही झाला. काही जणांनी क्रिकेटच्या सभ्यतेचा भंग केल्याचा अश्विनवर आरोप लावण्यात आला होता.
वास्तविक पाहता अश्विन जे कृत्य केले ते नियमाच्या विरोधात नव्हते. पण नैतिकतेला (स्पोर्ट्समनशिप) ला धरून नव्हते. या प्रकरणावर इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड गॉवर यांनी भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि तमाम क्रिकेटपटूंना एक मोठा सल्ला दिला आहे.
एक वर्ष झालेल्या या घटनेला इंग्लंडच्या या स्टायलिश फलंदाजाने पुन्हा हे प्रकरण उकरून काढले आहे. डेव्हिड गॉवर यांनी देखील आता अश्विनवर टीका केली आहे. त्यांच्या मते, मांकडिंग पद्धतीने बाद करण्यापूर्वी अगोदर फलंदाजाला ताकीद द्यायला हवी होती. तसे न करता अश्विनने त्याला बाद केले. या प्रकरणामुळे क्रिकेटचं महत्व कमी होते.
डेव्हिड गॉवर पुढे बोलताना म्हणाले की, हे प्रकरण घडले तेव्हा मी भारतातच होतो. खूप जवळून हे प्रकरण पाहिले. या प्रकरणाविषयी लोक मला वारंवार विचारत होते. या घटनेचे व्हिडिओ फुटेज पाहता बटलर क्रीज सोडून बराच लांब गेला होता. तसे पाहता बटलरने देखील अश्विन गोलंदाजी करताना काय करतोय याकडे देखील लक्ष ठेवायला हवे होते. अश्विनने अशा पद्धतीने बाद करायला नको होते.
मांकडिंग पद्धत म्हणजे नॉन स्ट्राइकवर असलेला फलंदाज चेंडू फेकणे आधीच क्रीज सोडून बाहेर गेल्यानंतर त्याला बाद करणे. कोणत्याही वयोगटात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटपटूंनी मांकडिंग पद्धतीने बाद करण्यापूर्वी अगोदर फलंदाजाला क्रीज न सोडण्याची ताकीद द्यावी अशा असा सल्लादेखील गॉवर यांनी दिला.