पुणे : निहार झंवरच्या दोन गोलच्या जोरावर एमजेएम ग्लॅडिएटर्स संघाने मालपाणी पँथर्स संघावर मात करून महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित न्याती माहेश्वरी फुटबॉल लीगमधील विजेतेपद पटकावले.
गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रल मॉलमधील फुटबॉल ग्राउंडवर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतील अंतिम लढतीत ग्लॅडिएटर्स संघाने पँथर्सवर ४-०ने मात केली. लढतीच्या तिस-याच मिनिटाला स्मित झंवरने गोल करून ग्लॅडिएटर्स संघाचे खाते उघडले. यानंतर काही वेळ ग्लॅडिएटर्स संघाचे आक्रमण रोखून धरण्यात पँथर्स संघाला यश आले. लढतीच्या १३व्या मिनिटाला जय मालपाणीने गोल करून ग्लॅडिएटर्स संघाची आघाडी २-०ने वाढवली. यानंतर निहारने (१५, १८ मि.) तीन मिनिटांच्या अंतरात दोन गोल करून ग्लॅडिएटर्सची आघाडी ४-०ने भक्कम केली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून ग्लॅडिएटर्स संघाने बाजी मारली.
तत्पूर्वी, झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत ग्लॅडिएटर्स संघाने दुबई एक्सपर्ट डायनामोज संघावर ३-० ने मात केली. ही लढत अगदीच एकतर्फी झाली. यात ग्लॅडिएटर्स संघाकडून रामानुज राठी (५ मि.), स्मित झंवर (९ मि.) आणि निहार झंवरने (१६ मि.) गोल केले. दुस-या उपांत्य लढतीत मालपाणी पँथर्स संघाने किअॅक किकर्स संघावर २-१ ने विजय मिळवला. पँथर्स संघाकडून प्रणव न्याती (२१ मि.) आणि तेज सारडा (२३ मि.) यांनी गोल केले, तर किकर्स संघाने एकमेव गोल श्रेष्ठ माहेश्वरीने (१० मि.) केला.
विजेत्यांना मालपाणी ग्रुपचे संचालक गिरिश मालपाणी आणि तारा डेव्हलपर्सचे नंदकिशोर राठी यांच्या हस्ते करंडक आणि पदक देऊन गौरविण्यात आले. या वेळी स्पर्धेचे मुख्य प्रायोजक न्याती ग्रुपचे प्रणव न्याती, महेश सेवा संघ युवा समितीचे अध्यक्ष विशाल राठी, सचिव केतन जाजू, रजत दरक, वेदांत कारवा, परम जखोटिया, जय मालपाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल –
अंतिम फेरी – एमजेएम ग्लॅडिएटर्स – ४ (निहार झंवर १५, १८ मि., स्मित झंवर ३ मि., जय मालपाणी १३ मि.) वि. वि. मालपाणी पँथर्स
उपांत्य फेरी – ग्लॅडिएटर्स – २ (रामानुज राठी५ मि., स्मित झंवर ९ मि., निहार झंवर १६ मि.) वि. वि. दुबई एक्सपर्ट डायनामोज – ०
मालपाणी पँथर्स – २ (प्रणव न्याती २१ मि., तेज सारडा २३ मि.) वि. वि. किअॅक किकर्स – १ (श्रेष्ठ माहेश्वरी १० मि.)
महत्वाच्या बातम्या –
IND vs SA । दक्षिण आफ्रिका अडचणीत, कर्णधाराच्या पुनरागमाबाबत संशय, पहिल्याच दिवशी झाली गंभीर दुखापत
पाकिस्तानशी भिडण्याआधी ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममध्ये अश्विन-जडेजाची चर्चा, स्मिथसह फोटो व्हायरल