कोरोनाच्या दुसर्या लाटेने कहर केल्यामुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे काही खेळाडूंनी तसेच पंचांनी आयपीएल मधून माघार घेतली आहे. यात विशेषतः ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश आहे.
मात्र माघार घेतलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंची आणि पंचांची आता अडचण झाली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणार्या विमानांवर बंदी घातली आहे. त्यामुळे हे खेळाडू आणि पंच भारतात अडकले आहेत. तसेच ऑस्ट्रेलियन सरकारने खेळाडूंच्या माघारीसाठी कुठलीही व्यवस्था करण्यास नकार दिल्याने केवळ माघार घेतलेल्या खेळाडूंच्याच नव्हे तर इतरही ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ग्लेन मॅक्सवेलने काढला तोडगा
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा केन रिचर्डसन आणि एॅडम झाम्पा या खेळाडूंनी माघार घेतली होती. त्यानंतर पंच पॉल रायफल यांनी देखील माघार घेतली होती. मात्र ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणार्या विमानांवर बंदी घातली आहे. त्यामुळे त्यांना भारतातच अडकावे लागले. ही परिस्थिती पाहून ऑस्ट्रेलियाच्याच ख्रिस लिनने सरकारकडे चार्टर्ड विमानाची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने ती फेटाळून लावली होती. त्यामुळे आता माघार घेतलेले खेळाडू आणि आयपीएल संपल्यानंतर इतर ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी कसे परतणार, हा प्रश्न निर्माण झाला होता.
यावर आता ग्लेन मॅक्सवेलने तोडगा काढला आहे. एका वाहिनीशी बोलतांना तो म्हणाला, “आयपीएल दरम्यान आम्ही बायो बबल मध्ये सुरक्षित आहोत. अशा परिस्थितीत आम्हाला केवळ आता मायदेशी परतण्याचा मार्ग शोधायचा आहे. यावर बीसीसीआय आणि दोन्ही देशाचे सरकार समाधानकारक तोडगा काढण्यासाठी काम करत आहेत. भारतीय संघ आयपीएल संपल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. जर परिस्थिती अजूनच खराब झाली तर आम्हाला काही काळ वाट पाहावी लागेल आणि मग भारतीय खेळाडूंसह इंग्लंडला जावे लागेल. आणि मग तिथून आम्ही मायदेशी जाऊ शकू. मला विश्वास आहे की या पर्यायावर इतर खेळाडू देखील सहमत असतील.”
केव्हा आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप?
इंग्लंड मध्ये १८ ते २२ जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आयपीएल नंतर २-३ जूनच्या दरम्यान भारतीय खेळाडू या सामन्यासाठी इंग्लंडला रवाना होतील. या सामन्यात खेळणारे न्यूझीलंडचे खेळाडू देखील भारतीय खेळाडूंसोबतच इंग्लंडला उड्डाण करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे आता मॅक्सवेलने सुचवलेला पर्याय देखील ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी अमलात आणला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
‘महाराष्ट्र दिना’निमित्त ‘मास्टर ब्लास्टर’ने शेअर केली वडिलांची कविता, तुम्हालाही नक्कीच आवडेल
मुंबईच्या शिलेदारांना जहीरने दिला विजयाचा मंत्र, पाहा व्हिडिओ