आयपीएल 2024 मध्ये ग्लेन मॅक्सवेल आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा हा स्टार अष्टपैलू खेळाडू आतापर्यंत संघासाठी बॅटनं कोणतंही योगदान देऊ शकलेला नाही.
राजस्थानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाचव्या सामन्यात मॅक्सवेल केवळ 1 धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅक्सवेलनं या हंगामाच्या पाच डावांत एकदाही 30 धावांचा टप्पा ओलांडलेला नाही. मात्र दुसरीकडे, त्यानं 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात अत्यंत चांगली कामगिरी केली होती.
ग्लेन मॅक्सवेलनं भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात स्फोटक फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. मात्र आता त्याच खेळपट्ट्यांवर मॅक्सवेल आयपीएलमध्ये सतत फ्लॉप होत आहे. विश्वचषकात अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना मॅक्सवेलनं द्विशतक झळकावलं होतं. त्या सामन्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे तो दोन्ही पायांवर नीट उभाही राहू शकत नव्हता. मात्र असं असूनही त्यानं अतिशय झुंजारू खेळी खेळून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता.
परंतु आयपीएलमध्ये पूर्णपणे तंदुरुस्त असूनही मॅक्सवेल आतापर्यंत काहीही करू शकलेला नाही. पाच डावांत फलंदाजी करताना तो चार वेळा सिंगल डिजिट स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये परतला असून त्यात दोन भोपळ्यांचाही समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 28 आहे. आयपीएल 2024 मध्ये पाच डावांमध्ये मॅक्सवेलनं अनुक्रमे 0, 3, 28, 0 आणि 1 धावा केल्या आहेत. या खराब फॉर्ममुळे तो आरसीबीसाठी ओझं बनलेला दिसतोय.
फलंदाजीसह मॅक्सवेल अनेकदा पार्ट टाइम गोलंदाजीही करतो. मात्र या मोसमात तो आरसीबीसाठी मुख्य गोलंदाजापेक्षाही चांगली कामगिरी करत आहे. एकीकडे आरसीबीचे पहिले तीन सामने खेळलेल्या अल्झारी जोसेफनं एकही बळी घेतला नाही, तर मॅक्सवेलनं 5 सामन्यात 4 फलंदाजांना आपलं शिकार बनवलं आहे. मात्र संघाला जर स्पर्धेत पुढे जायचं असेल तर मॅक्सवेलनं बॅटनं चमकदार कामगिरी करणं अत्यंत गरजेचं आहे. आता येत्या सामन्यांमध्ये तो कशी कामगिरी करतो हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीच्या शतकावर भारी जोस बटलरचं शतक! राजस्थान रॉयल्सचा आरसीबीवर शानदार विजय
‘रन मशीन’ कोहली थांबायचं नाव घेईना! आयपीएलमध्ये रचला आणखी एक इतिहास; आसपासही कोणी नाही!