रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा आयपीएल २०२१ स्पर्धेतील प्रवास अखेर संपला आहे. सोमवारी (११ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये एलिमिनेटरचा सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. त्यामुळे आता बेंगलोरचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने ट्रोल करणाऱ्यांना देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पोस्ट करत लिहिले की, “रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी हे हंगाम चांगले होता. आम्ही जितका विचार केला त्यापेक्षा आम्ही थोडे कमीच पडलो. परंतु याचा अर्थ असा मुळीच नाही की, आमच्यासाठी हा हंगाम निराशाजनक होता. तरीदेखील सोशल मीडियावर अशा गोष्टी घडत आहेत, ज्या खूप लाजिरवाण्या आहेत. त्यांना हे समजायला हवं की, आम्ही देखील मानव आहोत. आम्ही दरवेळी आमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उद्धट बोलणाऱ्यांना विनंती आहे की, चांगले बना.”
तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा पराभव झाल्यानंतर काही चाहत्यांनी आपल्याच खेळाडूंना शिवीगाळ करायला सुरुवात केली होती. त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत ग्लेन मॅक्सवेल म्हणाला की, “रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या खऱ्या चाहत्यांनी समर्थन केल्यामुळे मी आभार मानतो. काही निरुपयोगी लोक आहेत, ज्यांनी सोशल मीडियाला भीतीदायक ठिकाण बनवले आहे. जर तुम्ही आमच्या संघातील कुठल्याही खेळाडूला शिवीगाळ कराल, तर आम्हा सर्वांकडून तुम्ही ब्लॉक केले जाणार. वाईट व्यक्ती बनून काय उपयोग. अशा लोकांना क्षमा केले जाणार नाही.”
— Glenn Maxwell (@Gmaxi_32) October 11, 2021
ग्लेन मॅक्सवेलच्या आयपीएल २०२१ स्पर्धेतील कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर, त्याने या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील १५ सामन्यात त्याने ६ अर्धशतकांच्या साहाय्याने ५१३ धावा केल्या आहेत. गतवर्षी पंजाब किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करताना एकही षटकार मारण्यात अपयशी ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलने या हंगामात एकूण २३ षटकार मारले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘बिग बेन इज बॅक’! पुन्हा क्रिकेटचे मैदान गाजवायला सज्ज झाला स्टोक्स
निव्वळ योगायोग की आणखी काही? कर्णधार म्हणून जशी झाली सुरुवात तशीच झाली समाप्ती
श्रीलंका संघाच्या नव्या जर्सीची सोशल मीडियावर धूम; चाहत्यांनी मिळतेय पसंती