भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या बहुचर्चित क्रिकेट मालिकांना २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने होणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची टी२० मालिका होईल. दौऱ्याच्या अखेरीस, चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. भारतीय कर्णधार विराट कोहली हा कसोटी मालिकेतील पहिली कसोटी खेळून पितृत्व रजेवर भारतात परतेल. त्यामुळे विराटच्या अनुपस्थितीने भारतीय संघ अडचणीत येईल असे भाकीत अनेक माजी खेळाडूंनी वर्तवले होते. यातच, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राची भर पडली आहे. मात्र, याचवेळी त्याने विराटचे कौतुक देखील केले.
भारतीय संघ नव्हेतर, संपूर्ण मालिकेवर पडेल विराटच्या अनुपस्थितीचा प्रभाव
विराटच्या अनुपस्थितीचा भारतीय संघावर किती प्रभाव पडेल ? या प्रश्नाचे उत्तर देताना मॅकग्रा म्हणाला, “याचा फटका फक्त भारतीय संघच नाही तर संपूर्ण मालिकेला बसणार आहे. विराटसारखा दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण खेळाडू नसणे भारतासाठी त्रासदायक ठरेल. त्याचवेळी, इतर भारतीय फलंदाजांसाठी ही एक सुवर्णसंधी असेल. प्रथमच पिता होत असल्याने त्याचे भारतात परतणे योग्यच वाटते.”
विराट एकटाच दोन खेळाडूंच्या बरोबरीचा
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, मॅकग्राने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकांवरील अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तो पुढे म्हणाला, “विराट हा एकटाच दोन खेळाडूंच्या बरोबरीचा आहे. एक प्रमुख फलंदाज आणि कर्णधार अशा दुहेरी भूमिका तो बजावत असतो. विराटमुळे मैदानावर ऊर्जात्मक वातावरण राहते. ऑस्ट्रेलियाला या मालिकेत वर्चस्व गाजवण्याची चांगली संधी आहे. स्मिथ आणि वॉर्नर यांच्या येण्याने ऑस्ट्रेलियाला नक्कीच फायदा होईल.”
पहिली कसोटी ठरणार महत्त्वाची
आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज असलेल्या मॅकग्राने पहिल्या दिवस-रात्र कसोटीविषयी सांगताना म्हटले, “पहिली कसोटी खूपच रोमांचक होईल, असे मला वाटतेय. ही दिवस रात्र कसोटी आहे. भारतीय संघाने यापूर्वी ऑस्ट्रेलियात दिवस-रात्र कसोटी खेळलेली नाही. सायंकाळी सूर्यास्तानंतर, वेगवान गोलंदाज प्रभावी कामगिरी करतील. विराटला या एकाच सामन्यात काहीतरी विशेष करून दाखवावे लागेल. या पहिल्या सामन्याने संपूर्ण मालिकेची दिशा ठरेल.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी मालिकेचा पहिला सामना ऍडलेड येथे १७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असले. हा भारतीय संघाचा परदेशातील पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना आहे. याआधी भारतीय संघाने केवळ बांगलादेशविरुद्ध इडन गार्डन, कोलकाता येथे एक दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे.
विराट नसतानाही भारतीय संघ मजबूत
भारतीय संघाविषयी मॅकग्राने आपले मत मांडताना म्हटले, “विराट फक्त एकच कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे, त्याच्यावर जास्त लक्ष देण्यापेक्षा इतर खेळाडूंवर ऑस्ट्रेलियन संघाला लक्ष ठेवावे लागेल. विराटव्यतिरिक्त अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, रोहित शर्मा हे एकाहून एक सरस फलंदाज कसोटी मालिकेत खेळणार आहेत. त्यामुळे, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सावध राहण्याची गरज आहे.”
भारताच्या या ‘हाय प्रोफाइल’ दौऱ्याला सिडनी येथील वनडे सामन्याने सुरुवात होईल. तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिकेनंतर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला ऍडलेड येथे सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
ज्या दिवशी सचिन मैदानावर रडला, त्याच दिवशी सचिनला लाराने भेट दिली होती खास वस्तू
ऑस्ट्रेलियाला कसोटीत त्यांच्याच देशात नडत ‘या’ भारतीयाने केली होती अफलातून कामगिरी
आयपीएलमधील ‘हा’ युवा गोलंदाज लवकरच दिसणार टीम इंडियात, आगरकरने व्यक्त केला विश्वास