आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये न्यूझीलंडने सुपर ८मध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी मंगळवारी (१७ फेब्रुवारी) चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात कॅनडाचा ८ विकेट्सने पराभव केला आहे. कॅनडाने दिलेले १७४ धावसंख्येचे लक्ष्य न्यूझीलंडने १५.१ षटकातच पूर्ण केले. ग्लेन फिलिप्सला ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला. त्याने ३६ चेंडूत नाबाद ७६ धावा केल्या.
या सामन्यात कॅनडाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. त्यांचा सलामीवीर युवराज समराने शतकी खेळी केली. त्याने ६५ चेंडूत ११० धावा केल्या. त्यामुळे कॅनडाने २० षटकात ४ विकेट्स गमावत १७३ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात वाईट झाली. टीम सीफर्ट ६ धावा करत बाद झाला. त्यानंतर पाठोपाठच फॉर्ममध्ये असणारा फिन ऍलनही २१ धावा करत बाद झाला. त्याने ८ चेंडूत २ चौकार आणि एक षटकार मारले. यामुळे ३.१ षटकात न्यूझीलंडची स्थिती ३० धावा आणि २ विकेट्स अशी झाली. पुन्हा एकदा मोठा उलटफेर दिसतो की काय असे वाटत असताना रचिन रविंद्र आणि ग्लेन फिलिप्स यांनी ताबडतोब फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
रविंद्र आणि फिलिप्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७२ चेंडूत १४६ धावांची भागीदारी केली. ही न्यूझीलंडची टी२० विश्वचषकातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. पहिल्या स्थानावर सीफर्ट-ऍलनने याच स्पर्धेत केलेली नाबाद १७५ धावांची भागीदारी आहे.
यावेळी रविंद्र ३९ चेंडूत ५९ धावा करत नाबाद राहिला. यामध्ये त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. तसेच फिलिप्सने २२ चेंडूतच ५० धावा पूर्ण केल्या. यामुळे तो टी२० विश्वचषकात न्यूझीलंडकडून सर्वात जलद अर्धशतकी खेळी करणारा फलंदाज ठरला. तसेच तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये न्यूझीलंडसाठी सर्वाधिक षटकार मारणारा संयुक्तपणे दुसरा खेळाडू ठरला त्याने आतापर्यंत १०७ षटकार मारले आहेत.
न्यूझीलंडच्या या विजयानंतर अफगाणिस्तान स्पर्धेबाहेर झाले आहेत. त्याचबरोबर कॅनडा आणि यूएई हे संघही स्पर्धेबाहेर झाले आहेत. त्यामुळे ग्रुप डी मधून दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे संघ सुपर-८साठी पात्र ठरले आहेत.






