पुणे, १५ जुलै २०२३ : हरमित देसाईने अटीतटीच्या सामन्यात साथियन ज्ञानसेकरनचा पराभव करून गोवा चॅलेंजर्स संघाला इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ मध्ये दबंग दिल्ली टीटीसी विरुद्ध पहिला विजय मिळवून दिला. पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ही लीग सुरू आहे.
टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) च्या संयुक्त विद्यमाने निरज बजाज आणि विटा दाणी यांनी प्रमोट केलेली फ्रँचायझी-आधारित लीग २०१७ मध्ये स्थापन झाल्यापासून भारतीय टेबल टेनिससाठी गेम चेंजर आहे. आदरणीय केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी गोवा चॅलेंजर्स आणि दबंग दिल्ली टीटीसी यांच्यातील रोमहर्षक सामना पाहिला. अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ हा DafaNews द्वारे समर्थित आहे. गोवा चॅलेंजर्सने १०-५ अशा फरकाने दबंग दिल्ली टीटीसीवर विजय मिळवला.
गोवा चॅलेंजर्सच्या या रोमहर्षक विजयाचा नायक हरमित ठरला. त्याने चौथ्या लढतीत ( पुरुष एकेरी) साथियनविरुद्ध ३-० असा विजय मिळवला आणि त्यानंतर मिश्र दुहेरीत सुथासिनी सवेत्तबटसोबत विजय मिळवताना संघाला ८-४ अशी आघाडी घेऊन दिली. हरमित आणि साथियन या दोघांनी आक्रमक खेळ करताना एकमेकांना कडवी टक्कर दिली. त्यांनी फोअरहँडने मारलेले फटके चाहत्यांची उत्सुकता वाढवणारे ठरले आणि त्यांच्याकडून दोन्ही खेळाडूंना दाद मिळाली. हरमितने पहिला गेम ११-८ असा जिंकला आणि दुसऱ्या गेमममध्ये ११-५ अशी बाजी मारली. तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी तोडीसतोड टक्कर दिली, परंतु हाही गेम हरमितच्या बाजूने ११-१० असा सुटला.
हरमितच्या या अविश्वसनीय विजयानंतर सुथासिनीने महिला एकेरीत २-१ ( ११-७, ११-९, ८-११) अशा फरकाने बार्बोरा बालाझोव्हाचा पराभव केला आणि गोवा चॅलेंजर्सची गुणतालिकेतील पकड मजबूत केली. त्याआधी गोवा चॅलेंजर्सच्या अलव्हारो रोब्लेसने पुरुष एकेरीत २-१ अशा फरकाने जॉन पेर्सनचा पराभव केला. रॉब्लेसने मजबूत बचाव ठेवताना पेर्सनचे आक्रमण अपयशी केले. त्यानंतर त्याने आक्रमण व बचाव याचा संतुलित खेळ करून पहिला गेम ११-९ असा जिंकला, परंतु स्वीडिश खेळाडूने पुनरागमन करून दुसऱ्या गेममध्ये ११-८ अशी बाजी मारली. शेवटच्या सामन्यात रॉब्लेसने कोणतीच संधी न देता ११-४ असा विजय नोंदवला.
महिला एकेरीच्या आणखी एका सामन्यात दबंग दिल्ली टीटीसीच्या श्रीजा अकुलाने २-१ अशा फरकाने रिथ तेनिसनचा पराभव केला. रिथने सुरुवातीला झटपट गुणांची कमाई केली, परंतु श्रीजाने पुनरागमन करताना पहिला गेम ११-७ असा नावावर केला. गोवाच्या या खेळाडूने आक्रमक खेळ करताना दुसऱ्या गेम ११-६ असा जिंकला. तिसऱ्या गेममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली आणि श्रीजाने ११-९ अशी बाजी मारली. त्यामुळे दोन्ही संघांचे प्रत्येकी ३-३ असे गुण झाले होते.
मिश्र दुहेरीत हरमित व सवेत्तबट या गोवाच्या खेळाडूंनी दबंग दिल्लीच्या साथियन व बालाझोव्हा या जोडीवर २-१ असा विजय मिळवून संघाला ५-४ अशी आघाडी मिळवून दिली. हरमित व सुथासिनी यांनी पहिल्या गेममध्ये आक्रमक खेळ करून ११-२ अशी बाजी मारली. दुसरा गेमही गोवा फ्रँचायझीच्या नावावर राहिला, परंतु साथियन व बार्बोरा यांनी तिसऱ्या गेममध्ये पुनरागमन केले अन् ११-४ असा विजय मिळवला. इंडियन ऑइल टेबल टेनिस सीझन ४ चे सर्व सामने स्पोर्ट्स १८ आणि जिओ सिनेमावर सायंकाळी ७.३० वाजल्यापासून प्रसारित होत आहेत आणि BookMyShowवर तिकिट्स उपलब्ध आहेत. (Goa Challengers’ thrilling win in Ultimate Table Tennis Season 4)
दबंग दिल्ली टीटीसी ५-१० गोवा चॅलेंजर्स
जॉन पेर्सन १-२ अलव्हारो रॉब्लेस ( ९-११, ११-८, ४-११)
श्रीजा अकुला २-१ रीथ तेनिसन ( ११-७, ६-११, ११-९)
साथियन/बार्बोरा १-२ हरमित/सुथासिनी ( २-११, ६-११, ११-४)
साथियन ज्ञानसेकरन ०-३ हरमित देसाई ( ८-११, ५-११, १०-११)
बार्बोरा बालाझोव्हा १-२ सुथासिनी सवेत्तबट ( ७-११, ९-११, ११-८)
महत्वाच्या बातम्या –
बेअरस्टोच्या विवादित स्टंपिंगवर ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाची मोठी प्रतिक्रिया! म्हणाला, ‘मी आधीही असं…’
“प्लिज, आम्हाला मदत करा”, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकाची बीसीसीआयसह धोनी-विराटकडे आर्जव