ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत चौथ्या दिवशी भारताच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे. यात भारताच्या महिला खेळाडूंनी वर्चस्व राखले. चौथ्या दिवसात भारताने एकूण ६ पदके जिंकली. यात ३ सुवर्णपदके, १ रौप्य पदक आणि २ कांस्य पदके मिळाली आहेत.
त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धा २०१८मध्ये आत्तापर्यंत भारताची एकूण १२ पदके झाली आहेत. त्यातील ८ पदके तर वेटलिफ्टिंगमध्ये मिळाली असून आज ३ पदके नेमबाजांनी मिळवली आहेत. तसेच चौथ्या दिवसाखेरीस टेबल टेनिस क्रीडा प्रकारात भारताच्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकले आहे.
त्याचबरोबर चौथ्या दिवशी १० मी एअर पिस्तूलमध्येही महिला खेळाडूंचे वर्चस्व राहिले. यात भारताला मनू भाकेरने सुवर्ण आणि हिना सिद्धूने रौप्य पदक मिळवून दिले.
आत्तापर्यंत मिळालेल्या १२ पदकांमुळे भारत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.
या खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी जिंकली पदके:
पूनम यादव: आज भारताच्या विजयाची सुरुवात पूनम यादवने केली. तिने आज वेटलिफ्टिंगमध्ये ६९ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. तिने स्नच प्रकारात १०० किलो तर क्लीन आणि जर्क प्रकारात १२२ किलो वजन उचलले. असे मिळून तिने एकूण २२२ किलो वजन उचलून भारताला पाचवे सुवर्णपदक मिळवून दिले.
विकास ठाकूर: वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ८ वे पदक विकास ठाकूरने मिळवून दिले. त्याने ९४ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले. यासाठी त्याने स्नच प्रकारात १५९ किलो तर क्लीन आणि जर्क प्रकारात १९२ किलो असे मिळून एकूण ३५१ किलो वजन उचलले.
मनू भाकेर: भारतासाठी एकूण सहावे सुवर्णपदक नेमबाज मनू भाकेरने जिंकले. तिने नेमबाजीचा १०मी एअर पिस्तूल क्रीडा प्रकारात अशी कामगिरी केली. १६ वर्षीय मनूने राष्ट्रकुल स्पर्धेच्या पदार्पणातच सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिने सुवर्णपदक मिळवण्यासाठी एकूण २४०.९ गुण मिळवले.
हिना सिद्धू: १० मी एअर पिस्तूल क्रीडा प्रकारात भारताला दुसरे मेडल हिना सिद्धूने मिळवून दिले. तिने आज रौप्य पदकाची कमाई केली. २८ वर्षीय हिनाने यासाठी एकूण ३३४ गुण मिळवले. याआधी तिने २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत १०मी एअर पिस्तूल प्रकारातच सांघिक सुवर्णपदक तर वयक्तिक रौप्य पदक मिळवले होते.
रवी कुमार: राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज रवी कुमारने १० मी एअर रायफल क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकले. यासाठी त्याने २२४.१ इतके गुण मिळवत कांस्यपदकाची कमाई केली. त्याने राष्ट्रकुल स्पर्धा २०१८मध्ये हे नेमबाजीमधील भारतासाठीचे तिसरे पदक जिंकले.
टेबल टेनिस महिला संघ: टेबल टेनिस क्रिडा प्रकारात भारताच्या महिला संघाने सुवर्णपदकाची कमाई करताना भारतासाठी १२ वे पदक तर ७ वे सुवर्णपदक जिंकले. भारतीय महिलांनी अंतिम फेरीत सिंगापूर संघाला ३-१ ने पराभूत करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
हे सुवर्णपदक मिळवताना मणिका बात्राची एकेरी लढतीतील विजयी कामगिरी तसेच दुहेरी लढतीत मौमा दास आणि मधुरिका पाटकर या जोडीने मिळवलेला विजय महत्वाचा ठरला. सिंगापूर विरुद्धच्या अंतिम फेरीतील दुसऱ्या एकेरी लढतीत मात्र मधुरीका पटकरला पराभूत व्हावे लागले होते. पण मणिका बात्राच्या एकेरी लढतीतील विजयामुळे आणि मौमा-मधुरिका यांच्या दुहेरीतील विजयामुळे भारताचे सुवर्णपदक निश्चित झाले.