आठव्या टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup) दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड (INDvENG) यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना 10 नोव्हेंबरला ऍडलेडच्या ओव्हलवर खेळला जाणार आहे. त्याआधीच जोस बटलर याच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड संघाचा स्फोटक फलंदाज डेविड मलान दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे स्पष्टीकरण मोईन अली याने सोमवारी (7 नोव्हेंबर) दिले.
डेविड मलान (Dawid Malan) याला नॉकआऊटच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्याच्याविषयी मोईन अली (Moeen Ali) याने सोमवारी माध्यमाशी बोलताना म्हटले, “तो मागील काही महिन्यापासून आमचा उत्तम खेळाडू राहिला आहे. मला नाही माहित, मात्र त्याची स्थिती ठिक वाटत नाही. त्याला काल स्कॅनसाठी नेले होते. जेव्हा तो परतला तेव्हा आम्हाला त्याच्याकडे पाहून त्याची तब्येत योग्य वाटली नाही.”
मलानला श्रीलंकेविरुद्धच्या सुपर 12च्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्या सामन्यात इंग्लंडला 142 धावांचे लक्ष्य मिळाले होते. तेव्हादेखील तो फलंदाजी करण्यास आला नाही. यावरूनच त्याची दुखापत किती गंभीर आहे, याचा अंदाज येतो.
मोईन पुढे म्हणाला, “भारताचे यावर्षी उत्तम प्रदर्शन राहिले आहे, मात्र इंग्लंड अंडरडॉग आहे. तसेच या स्पर्धेत पाहिले तर भारतच सर्वोत्तम दिसत आहे आणि आम्ही मागे आहोत.”
मलान हा इंग्लंडकडून आयसीसी टी20 फलंदाजाच्या क्रमवारीतील सर्वोत्तम खेळाडू आहे, मात्र त्याला विश्वचषकात हवी तशी कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत त्याने 35 धावांची खेळी केली ती सर्वोत्तम ठरली. ही खेळी त्याने 37 चेंडूत आयर्लंड विरुद्ध केली होती. हा सामना इंग्लंडने 5 धावांनी गमावला होता. तसेच त्याने भारताविरुद्ध 8 टी20 सामन्यात खेळताना 2 अर्धशतकांच्या सहाय्याने 265 धावा केल्या आहेत.
मलान खेळायला आला नाही तर त्याची जागा फिल सॉल्ट घेऊ शकतो, कारण तोच एकमात्र खेळाडू इंग्लंडकडे सलामीसाठी उपलब्ध आहे. सॉल्टने 11 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 235 धावा केल्या आहेत. त्यामध्ये सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानविरुद्ध केलेली 88 धावांची खेळी त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या ठरली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिकी पॉंटिंगची भविष्यवाणी! म्हणाला ‘हा’ बनू शकतो ऑस्ट्रेलियाचा पुढचा कर्णधार
टी20 विश्वचषकाच्या धामधुमीत किंग कोहली ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’, महिलांमध्ये ‘ही’ ठरली विजेती