टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये आमनेसामने येणार होते. नियोजित वेळापत्रकानुसार सर्व तयारीही पूर्ण झाली होती. मात्र, १ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान सरकारने भारतासोबत खेळण्यास नकार दिला होता. पण आता ताज्या अपडेट्सनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया.
रविवार, ८ फेब्रुवारी रोजी लाहोरमध्ये आयसीसी (ICC), पीसीबी (PCB) आणि बीसीबी (BCB) यांची बैठक सुरू झाली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तानमधील सामन्याला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. आयसीसीचे दोन प्रतिनिधी इम्रान ख्वाजा आणि मुबाशिर उस्मानी रविवारी सकाळीच लाहोरला पोहोचले आहेत.
यापूर्वी, बांगलादेशची बाजू घेण्यासाठी पाकिस्तानने भारतासोबतच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. सुरक्षा कारणांचा हवाला देत बांगलादेशने विश्वचषक सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येण्यास नकार दिला होता आणि आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळवण्याची विनंती आयसीसीकडे केली होती. मात्र, आयसीसीने बांगलादेशची ही मागणी फेटाळून लावली आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडचा संघात समावेश केला.
या प्रकरणानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पत्र लिहिले. भारत-पाकिस्तान सामना न झाल्यास श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मोठे आर्थिक नुकसान होईल आणि यामुळे आयोजनासह स्पर्धेच्या प्रतिमेलाही तडा जाईल, असे पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे श्रीलंका भारतासोबत मिळून टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे यजमानपद भूषवत आहे. टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानने आपल्या मोहिमेची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून केली आहे. भारताने अमेरिकेचा पराभव केला, तर पाकिस्तानने नेदरलँड्सवर विजय मिळवून सुरुवात केली आहे.






