१४३ वर्षांचा इतिहास असलेल्या कसोटी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूंपर्यंत मोठे मोठे विक्रम केले आहेत. अनेकांना कसोटी क्रिकेटमध्ये मोठे यश मिळाले. तसेच आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणे हा एखाद्या क्रिकेटपटूसाठी एक मोठा सन्मान आहे. मात्र असे काही क्रिकेटपटू होऊन गेले, ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत खूप यश मिळवले, आज ते दिग्गज क्रिकेटपटू म्हणूनही ओळखले जातात, पण त्यांना आयसीसीच्या क्रमवारीत मात्र अव्वल स्थान मिळवता आले नाही.
या लेखातही अशाच काही दिग्गज फलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांची कसोटी कारकिर्द यशस्वी होती पण तरीही त्यांना आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवता आले नाही.
८. ब्रेंडन मॅक्यूलम –
न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलम हा १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळणाऱ्या ३ क्रिकेटपटूंपैकी १ आहे. त्याने कसोटीत १०१ सामन्यात १२ शतकांसह ३८.६४ च्या सरासरीने ६४५३ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे तो कसोटीत सर्वात जलद शतक करणाराही क्रिकेटपटू आहे. मात्र असे असले तरी मॅक्यूलमला कधी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवता आला नाही. विशेष म्हणजे त्याला कधी पहिल्या १० फलंदाजांच्यामध्येही स्थान मिळवता आले नाही.
त्याची सर्वोत्तम कसोटी क्रमवारी ही १२ ही राहिली. तो १२ व्या क्रमांकावर भारताविरुद्ध वेलिंग्टनमध्ये त्रिशतकी खेळी केल्यानंतर आला होता. त्याला २०१४ च्या दरम्यान पहिल्या १० फलंदाजांमध्ये स्थान मिळवण्याची संधी होती. त्याने २०१३ च्या अखेरीस वेस्ट इंडिज विरुद्ध चांगला खेळ केला होता. तसेच भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत द्विशतक आणि त्रिशतकही केले होते. पण नंतर त्याच्या कामगिरीत सातत्य नसल्याने त्याला पहिल्या १० फलंदाजांमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले.
७. ख्रिस गेल –
एक स्फोटक सलामीवीर फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने दोन वेळा कसोटीत त्रिशतके करण्याचा पराक्रम केला आहेस. ३३३ धावा ही त्याची कसोटीतील सर्वोच्च खेळी आहे. हे त्रिशतक त्याने २०१० ला श्रीलंकेविरुद्ध गाले येथे खेळताना केले होते. या खेळीनंतर त्याने कसोटी फलंदाजी क्रमवारीत १० वे स्थान मिळवले होते. हे त्याचे कसोटी क्रमवारीतील सर्वोच्च स्थान आहे. या वरचे स्थान त्याला कधीही कसोटी क्रमवारीत मिळवता आलेले नाही.
गेलने त्याच्या कसोटी कारकिर्दीत १०३ कसोटी सामन्यात ४२.१९ च्या सरासरीने ७२१५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १५ शतकांचा आणि ३७ अर्धशतकांचा समावेश आहे.
६. केविन पीटरसन –
इंग्लंडचा स्टायलिश फलंदाज म्हणून ओळख मिळवलेला केविन पीटरसनने २००५ ला ऍशस मालिकेतून कसोटीत पदार्पण केले होेते. त्याच्यासाठी ही मालिका शानदार राहिली. तो त्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा इंग्लंडचा खेळाडू होता. त्यानंतरही त्याच्यासाठी भारत, श्रीलंका आणि पाकिस्तानचा दौरा चांगला ठरला.
त्याने डिसेंबर २००६ ला त्याच्या कसोटी क्रमवारीत तिसरा क्रमांक मिळवला. ही त्याची कारकिर्दीतील सर्वोच्च क्रमवारी होती. मात्र त्याला अव्वल क्रमांकाच्या जवळ येऊनही हे स्थान मिळवता आले नाही.
त्याने त्याच्या कारकिर्दीत १०४ कसोटी सामने खेळताना ४७.२८ च्या सरासरीने ८१८१ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २३ शतकांचा आणि ३५ अर्धशतकांचा सामावेश आहे.
५. जस्टीन लँगर – ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांना दिग्गज कसोटीपटूंमध्ये गणले जाते. त्यांनी कसोटीत सलामीवीर फलंदाज म्हणून मोठी कारकिर्द घडवली. त्यांनी १०५ कसोटी सामने खेळताना त्यांनी ४५.२७ च्या सरासरीने ७६९६ धावा केल्या. त्यांनी आणि मॅथ्यू हेडनसह अनेक मोठ्या भागीदाऱ्या केल्या.
ते सुरुवातीला मधल्या फळीत फलंदाजी करायचे. पण २००१मध्ये इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस मालिकेत लँगर यांना सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. यावेळी संधीचे सोने करत त्यांनी पहिल्याच सामन्यात १०२ धावा केल्या होत्या.
त्यानंतरच्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत त्यांनी २ शतकी खेळी केल्या. तर त्यानंतर लगेचच दक्षिण आफ्रिका विरुद्धही २ शतके केली. तो त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम काळ होता. मात्र त्यांना कधी कसोटी क्रमवारीत पहिल्या ५ फलंदाजांमध्ये स्थान मिळवता आले नाही. त्यांनी फेब्रुवारी २००२ ला ६ वे स्थान मिळवले होते. हे त्यांचे कसोटी क्रमवारीतील सर्वोच्च स्थान आहे.
४. हर्षेल गिब्स – वनडे क्रिकेटमध्ये सलग ६ चेंडूत ६ षटकार मारणाऱ्या हर्षेल गिब्सेची कसोटी कारकिर्दही चांगली राहिली आहे. मात्र जेव्हा त्याने कसोटी कारकिर्द सुरु केली तेव्हा त्याची कामगिरी फारशी बरी नव्हती. पण त्याने १९९९ मध्ये १३ वा कसोटी सामना खेळताना न्यूझीलंडविरुद्ध ख्राईस्टचर्च येथे द्विशतक झळकावले. तसेच लगेचच पुढच्या सामन्यात त्याने शतकी खेळीही केली. पण पुन्हा एकदा त्याची कामगिरी खालावली.
मात्र २००१ ते २००५ पर्यंत त्याने त्याच्या कामगिरीत बऱ्यापैकी सातत्य ठेवले होते. त्याने त्याच्या कारकिर्दीतील दुसरे द्विशतक २००३ ला पाकिस्तानविरुद्ध केले. त्यानंनतर त्याने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतही २ शतके केली. तर त्याने २००३-०४ ला झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत तीन शतके झळकावली. पण त्याच्या या शानदार फॉर्मनंतरही त्याला कसोटी क्रमवारीत ६ वे स्थानच मिळवता आले. त्यावरचे स्थान मिळवण्यात त्याला अपयश आले. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ९० सामने खेळताना ४१.९५ च्या सरासरीने ६१६७ धावा केल्या.
३. व्हीव्हीएस लक्ष्मण – भारताचा दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणनचे नाव कसोटीतील दिग्गज फलंदाजांमध्ये सन्मानाने घेतले जाते. त्याने कसोटीत अनेक मोठे पराक्रम केले आहे. १९९६ ला कसोटीत पदार्पण केलेल्या लक्ष्मणने २०१२ पर्यंत १३४ कसोटी सामने खेळताना ४५.९७ च्या सरासरीने ८७८१ धावा केल्या.
त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाता कसोटीत २००१ ला केलेली २८१ धावांची खेळीची चर्चा आजही होते. मात्र त्यालाही कसोटी क्रमवारीत कधीही फलंदाजांच्या यादीत पहिल्या ५ जणांमध्येही स्थान मिळवता आले नाही. त्याने २०११ ला कसोटी क्रमवारीत ६ वे स्थान मिळवले होते. हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान ठरले. यानंतर त्याने एकवर्षाने २०१२ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
२. सनथ जयसुर्या – श्रीलंकेचा स्फोटक फलंदाज सनथ जयसुर्याची वनडे कारकिर्द चांगलीच बहरली. त्यामानाने त्याला कसोटीत तेवढे यश मिळाले नाही. पण तरीही त्याने अनेकदा कसोटीतही चांगल्या खेळी केल्या आहेत. २००४ ला ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि पाकिस्तान अशा तीन संघांविरुद्ध त्याने प्रत्येकी १ शतक केले. यात त्याच्या पाकिस्तान विरुद्धच्या द्विशतकाचाही समावेश आहे.
त्याच्या कामगिरीमुळे त्याने जानेवारी २००५ मध्ये कसोटी क्रमवारीत तिसरे स्थान मिळवले होते. हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान होते. पण त्याला कधी अव्वल स्थान मात्र मिळवता आले नाही. त्याने त्याच्या कारकिर्दीत ११० कसोटी सामने खेळताना ४०.०७ च्या सरासरीने १४ शतकांसह ६९७३ धावा केल्या. तसेच त्याने गोलंदाजी करताना ९८ विकेट्सही घेतल्या आहेत.
त्याने २००७ मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली. त्याने त्याच्या शेवटच्या सामन्यात जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर सलग ६ चेंडूत ६ चौकार मारले होते.
१. ग्रॅमी स्मिथ – दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू ग्रॅमी स्मिथ हा जगातील सर्वाधिक कसोटी खेळणारा व सर्वाधिक कसोटी जिंकणारा कर्णधार आहे. वयाच्या २२व्या वर्षा दक्षिण आफ्रिकेसारख्या जगातील एका मोठ्या संघाचे त्याने नेतृत्त्व केले होते.
त्याने कसोटीत त्याची शानदार कारकिर्द घडवली. स्मिथने कसोटी कारकिर्दीत एकूण ११७ कसोटी सामने खेळताना यातील तब्बल १०९ सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्त्व केले. म्हणजे फक्त खेळाडू म्हणून तो केवळ ८ सामने खेळला. तसेच त्याने त्याच्या कारकिर्दीत ४८.२५ च्या सरासरीने ९२६५ धावा केल्या. यात त्याच्या एकूण २७ शतकांचा समावेश आहे. तसेच त्याने ५ द्विशतकेही केली. पण एवढे असूनही कधी त्याला कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवता आला नाही.
त्याने २००३ ला इंग्लंड विरुद्ध सलग २ कसोटीत २ द्विशतके केली होती. तसेच त्याने हर्षेल गिब्सबरोबर ४ वेळा सलामीला ३०० पेक्षा अधिक धावांची भागीदारीही केली आहे. तर निल मॅकेन्झीबरोबर चटगाव येथे त्याने ४१५ धावांची भागीदारी केली होती.
मात्र त्याला कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानापर्यंतच मजल मारता आली. त्याने जानेवारी २०१० ला कसोटी क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले होते. त्यावेळी भारताचा फलंदाज गौतम गंभीर अव्वल क्रमांकावर होता.
ट्रेंडिंग लेख –
फक्त महाराष्ट्रीयन खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची कसोटी ड्रीम ११
केवळ १ टी२० सामना खेळणारे जगातील ५ प्रसिद्ध क्रिकेटर
ना विराट, ना रोहित, ना सचिन; फक्त विरुच्या नावावर आहे हा खास विक्रम