भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही क्रिकेट जगतातील सामर्थ्यवान संघ आहेत. या दोन्ही संघात होणाऱ्या क्रिकेट सामन्यांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. कारण या संघांमध्ये जागतिक क्रिकेटमधील आघाडीच्या फलंदाजांचा समावेश आहे. यात सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे भारतीय कर्णधार विराट कोहली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाने विराटचे तोंडभरून कौतुक केले आहे.
भारतीय क्रिकेटपटूंचा दृष्टिकोन बदलणारा गांगुली हा पहिला कर्णधार- चॅपेल
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वृत्तपत्रात लिहिलेल्या स्तंभामध्ये म्हटले की, “पूर्वीचे अनेक भारतीय क्रिकेटपटू विरोधकांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत नव्हते, कदाचित ते गांधीजींच्या सिद्धांतावर चालत असतील. मात्र, क्रिकेटपटूंचा हा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करणारा सौरव गांगुली पहिला भारतीय कर्णधार होता. यामुळे या संघाला भारतात यश मिळाले, परंतु परदेशात ही रणनिती प्रभावी ठरली नाही.”
शांत पद्धतीने उत्तर देण्यावर कोहलीचा नाही विश्वास
पुढे बोलताना चॅपेल म्हणाले की, “विराट कोहली शांत पद्धतीने उत्तर देण्यावर विश्वास ठेवत नाही. तो आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. विरोधकांवर वर्चस्व गाजवण्याचा त्याचा प्रयत्न असतो.”
कोहली सर्वाधिक आक्रमक फलंदाज
विराटची प्रशंसा करताना चॅपेल म्हणाले की, “ऑस्ट्रेलियाव्यतिरिक्त इतर देशातील सर्व फलंदाजांमधील कोहली सर्वाधिक आक्रमक फलंदाज आहे. तो नव्या भारतीय संघाचा प्रतीक आहे. सामर्थ्यवान क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून या खेळाला महत्त्व देण्याची जबाबदारी तो योग्य प्रकारे पार पाडतोय.”
कसोटीत भारताला प्रतिष्ठा मिळावी, ही कोहलीची इच्छा
“कसोटी क्रिकेटचं भविष्य अंधारात असताना कोहलीसारख्या चॅम्पियन क्रिकेटपटूमुळे सकारात्मकता जाणवते. त्याने कसोटी क्रिकेटला नेहमीच प्राधान्य दिलं आहे. यामुळे स्वत: ला तंदुरुस्त आणि मजबूत ठेवण्यास त्याला प्रेरणा मिळते. म्हणूनच त्याला संघाकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. क्रिकेटच्या या प्रकारात भारताला प्रतिष्ठा मिळावी, अशीच त्याची इच्छा आहे,” असेही पुढे बोलताना चॅपेल म्हणाले.
सध्याच्या स्थितीत कोहली सर्वश्रेष्ठ
जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांविषयी बोलताना चॅपेल म्हणाले की, “सध्याच्या परिस्थितीत कोहली सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. कोहलीसह स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियम्सन हे सुद्धा सर्वोत्कृष्ट फलंदाजांच्या शर्यतीत आहेत. इतिहासाकडे पाहता स्मिथ आघाडीवर आहे. परंतु तिघांचीही करणे अवघड आहे. तथापि, जागतिक क्रिकेटच्या सध्याच्या परिस्थितीत कोहली हा सर्वात महत्वाचा खेळाडू आहे.”
अब्जावधी लोकांच्या आशा व आकांक्षासमवेत फलंदाजी करणे अवघड
“कोहली प्रभावशाली क्रिकेटपटू आहे. त्याच्यावर सर्वाधिक दबाव असतो. अब्जावधी लोकांच्या आशा व आकांक्षा समवेत फलंदाजी करणे खूप अवघड आहे, ज्याला आपण कमी लेखू शकत नाही,” असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत
ट्रेंडिंग लेख-
शंभर शतके ठोकणाऱ्या सचिनला आवडतात स्वतःच्या ‘या’ तीन खेळ्या; दुसरी आहे खूपच खास
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’