अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’

भारतीय संघाचा यष्टीरक्षक पार्थिव पटेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली

सन २००२ मध्ये भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. प्रतिष्ठेच्या ऍशेस इतकीच भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेची चर्चा सुरू होती. भारत आणि इंग्लंड दरम्यान पहिला सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला गेला. या पहिल्याच सामन्यात भारताला १७० धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. याच सोबत भारतीय संघासाठी दुसरी अशी अडचण निर्माण झाली की, या दौऱ्यावर प्रमुख यष्टीरक्षक म्हणून आलेला अजय रात्रा दुसऱ्या कसोटीच्या आदल्या दिवशी दुखापतग्रस्त झाला. रात्रानंतर भारतीय संघात दुसरा यष्टीरक्षकच नव्हता. अनुभवी राहुल द्रविडला कामचलाऊ यष्टीरक्षक बनवण्याचा पर्याय संघ व्यवस्थापनाकडे होता.

अशी झाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पार्थिवची एन्ट्री

भारतीय संघ अडचणीत असताना नेमके कोणाला तरी आठवले की, भारताच्या एकोणीस वर्षाखालील मुलांचा संघ इंग्लंडमध्येच मालिका खेळत आहे. त्या संघातील एका यष्टीरक्षकाला खेळवायचे ठरले.‌ पटापट सर्व माहिती काढली गेली आणि एका १७ वर्षीय यष्टीरक्षकाला दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी देण्याचे ठरले. हा १७ वर्षाचा यष्टीरक्षक होता पार्थिव पटेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारा यष्टीरक्षक होण्याचा मान पार्थिवला मिळाला होता.

फायर अलार्मचे दाबले होते बटन

एक गोंडस चेहऱ्याचा लहान मुलगा म्हणून पार्थिवला पहिल्या सामन्यातूनच ओळख मिळाली. या १७ वर्षांच्या लहान मुलाने आपल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशीच नॉटिंगहॅमच्या मैदानावरील फायर अलार्म वाजवून सर्वांना त्रस्त केले होते. त्याने पहिल्या सामन्यात विशेष कामगिरी केली नाही, तरीही त्याचा हा किस्सा अजूनही चांगलाच तिखट-मीठ लावून सांगितला जातो.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेली दमदार कामगिरी

पार्थिव पटेलला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी जरी नशिबाने मिळाली असली, तरी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा काढल्या होत्या. २००० मध्ये त्याने आपला पहिला प्रथमश्रेणी सामना खेळलेला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी अगदीच उच्चदर्जाची नसली, तरी अत्यंत वाईटही नव्हती. त्यामुळेच तो भारताच्या युवा संघात खेळत होता आणि नंतर राष्ट्रीय संघाकडून खेळला.

स्टीव्ह वॉला केले होते स्लेज

पार्थिवच्या सुरुवातीच्या कारकिर्दीतील एक किस्सा जगप्रसिद्ध आहे. सन २००३-२००४ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेला. या दौऱ्यातील अखेरच्या सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार स्टीव्ह वॉ आपला अखेरचा सामना खेळणार होता. त्या सामन्यात भारताच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी पार्थिवच्या खांद्यावर होती.

पार्थिव आपला दुसराच दौरा खेळत होता, तर वॉ आपला अखेरचा सामना खेळत होता. या लहान मुलाने त्यावेळी मजेमजेत स्टीव्ह वॉला स्लेज करायला सुरुवात केली. पार्थिव स्टंपमागून म्हणायचा, ‘स्वीप मारून दाखव ना. यानंतर तुला तो शॉट खेळायला मिळणार नाही.’

पार्थिवच्या या स्लेजिंगकडे वॉने काही काळ दुर्लक्ष केले. मात्र, ज्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना स्लेजिंगचे बाळकडू लहानपणापासून मिळालेले असते ते ऑस्ट्रेलियन खेळाडू गप्प राहणे म्हणजे महाकठीण काम. वॉने थोड्या वेळातच पार्थिवला उत्तर देताना म्हटले, ‘बेटा, तू जरा गप्प बस. थोडीशी इज्जत दे. जेव्हापासून मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय ना, तेव्हा तू नॅपीमध्ये होतास.’
वॉच्या या उत्तराने पार्थिवची बोलतीच बंद झाली होती. स्टीव्ह वॉची ही गोष्ट खरी होती. कारण, वॉने १९८५ साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते आणि त्याच वर्षी पार्थिवचा जन्मही झाला होता.

तब्बल ८३ सामने होता संघाबाहेर

वयाच्या सतराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केलेल्या पार्थिवला पहिल्या पाच सामन्यानंतर संघातून डच्चू देण्यात आला. त्याची कामगिरी तितकीशी समाधानकारक नव्हती. दुसरीकडे नवीन यष्टीरक्षक संघात आपली जागा बनवत होते. पार्थिव तब्बल ८३ सामने संघाबाहेर होता. सन २००८ मध्ये पहिल्यांदा पुनरागमन करत त्याने कसोटी संघात जागा पटकावली.

कधीही नाही झाला भारताचा नियमित सदस्य

पार्थिवसाठी भारतीय संघात जागा बनवणे अवघड जात होते. कारण, भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनी स्वतः यष्टीरक्षक होता. पार्थिव ज्या सलामीच्या स्थानावर खेळायचा, त्या जागीदेखील सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासारखे दिग्गज खेळाडू होते. इतके सर्व असतानाही पार्थिव कायमच भारतीय संघाच्या अवतीभवती राहिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला मिळत नसले, तरी तो दरवेळी आयपीएलमध्ये सहभागी होत, देशांतर्गत क्रिकेटचे सर्व सामने खेळत. त्याचमुळे त्याला अधून मधून भारतीय संघात जागादेखील मिळायची. मात्र, तो संघाचा नियमित सदस्य कधीच झाला नाही.

देशांतर्गत क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार

गेली अनेक वर्ष गुजरात संघाचा कर्णधार राहिलेल्या पार्थिवच्या नावे देशांतर्गत क्रिकेटमधील तीन प्रमुख विजेतेपदे आहेत. सन २०१२-२०१३ या वर्षी त्याच्या नेतृत्वात गुजरातने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, २०१५-२०१६ मध्ये विजय हजारे ट्रॉफी व २०१७-२०१८ मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली. आयपीएलमध्ये देखील तो मुंबई इंडियन्सकडून विजेत्या संघाचा भाग राहिला. देशांतर्गत क्रिकेट मधील तिन्ही प्रमुख स्पर्धा कर्णधार म्हणून जिंकणारा एकमेव खेळाडू आहे.

१८ वर्षाची राहिली आंतरराष्ट्रीय कारकीर्द

जवळपास अठरा वर्ष भारतीय खेळाडू म्हणून मिरवणाऱ्या पार्थिवच्या नावापुढे १८ वर्षात अवघे २५ कसोटी, ३८ वनडे व २ टी२० सामने लागले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा रनर म्हणून देखील पार्थिवचे नाव घेतले जाईल. क्रिकेटमध्ये आकडेवारीला महत्त्व असते असे म्हणतात. मात्र, पार्थिवाच्या आकडेवारीपेक्षा त्याच्या संघात असण्या-नसण्याची चर्चा कायम झाली.

भारतीय संघाकरिता २००२ ते २०२० या काळात एमएस धोनी, अजय रात्रा, राहुल द्रविड, दिनेश कार्तिक, वृद्धिमान साहा, नमन ओझा, रिषभ पंत यांसारखे अनेक यष्टीरक्षक खेळून गेले. परंतु, या सर्वांमध्ये पार्थिवला कायमच सावत्र वागणूक दिल्याचे दिसून आले. मात्र, कधीतरी भारतीय संघाचा नियमित सदस्य म्हणून मलाही खेळायला मिळेल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या पार्थिवच्या आशा आज मावळल्याच्या दिसून आल्या.

एमएस धोनीने त्याचे स्थान भारतीय संघात पक्के केल्यामुळे जे यष्टीरक्षक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त संधी मिळवू शकले नाहीत. त्यामध्ये पार्थिवचे नाव अग्रक्रमावर राहील. भारतीय क्रिकेटच्या या हसतमुख पार्थिवला खरे चाहते आंतरराष्ट्रीय क्रिकेट, देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये नक्कीच मिस करतील.

ट्रेंडिंग लेख-

अरेरे! क्रिकेट जगतावर राज्य करूनही कधीच रणजी ट्रॉफी न जिंकलेले ४ भारतीय दिग्गज

टीम इंडियाचे ३ धडाकेबाज गोलंदाज, ज्यांनी केली २०२० मध्ये वनडेत सर्वोत्तम कामगिरी

टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यातून विराट होऊ शकतो बाहेर, स्वत:च दिले संकेत

‘चार महिन्यांपासून मुलाचं तोंड नाही पाहिलं’, सामनावीर पुरस्कार पटकावणारा पंड्या भावूक

धडकी भरवणारा क्षण! कार्तिक त्यागीचा चेंडू लागला पुकोवस्कीच्या डोक्याला, अन् पुढे काय झालं पाहाच…

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.