आयपीएलचा पाच वेळेचा मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा विजयाचा सूर गवसला आहे. २०२६ च्या हंगामात सलग चार पराभवानंतर एमआयने सोमवारी (२० एप्रिल) आपला या हंगामातील दुसरा विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या या सामन्यात एमआयने ९९ धावांनी विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तिलक वर्मा. त्याने नाबाद शतकी खेळीबरोबरच अनेक विक्रमही केले आहेत.
तिलकने जीटीविरुद्ध ४५ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या आणि एमआयसाठी इतिहास रचला. तिलक एमआयकडून खेळताना इतिहासात एकट्याने विरोधी संघाला पराभूत करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. जीटी या सामन्यात धावांचा पाठलाग करताना १०० धावसंख्येवर सर्वबाद झाला. यावरून तिलकने संपूर्ण जीटी संघापेक्षा एक धाव अधिक केली.
आयपीएलमध्ये असे पुढील खेळाडूंनी केले आहे, प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये केकेआरचा ब्रेंडन मॅक्युलम (नाबाद १५८ धावा वि. आरसीबी – ८२), आरसीबीचा राहुल द्रविड (६६ धावा वि. आरआर – ५८), आरसीबीचा क्रिस गेल (नाबाद १७५ धावा वि. पीडब्ल्यूआय-१३३), आरसीबीचा क्रिस गेल (११७ धावा वि. पंजाब-८८), आरसीबीचा एबी डिविलियर्स (नाबाद १२९ धावा वि. जीएल – १०४), आरसीबीचा विराट कोहली (१०९ धावा वि. जीएल-१०४), एसआरएचचा जॉनी बेयरस्टो (११४ धावा वि. आरसीबी – ११३), पंजाब किंग्जचा केएल राहुल (नाबाद १३२ धावा वि. आरसीबी – १०९) आणि एमआयचा तिलक वर्मा (नाबाद १०१ वि. जीटी – १००)
आयपीएलमध्ये प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अधिक धावा करणारा तिलक एमआयचा पहिला आणि इतिहासातील नववा खेळाडू ठरला आहे. तसेच त्याची ही शतकी खेळी एमआयकडून संयुक्तपणे सर्वात जलद शतकी खेळी ठरली आहे. त्यांच्याकडून २००८ मध्ये सनथ जयसूर्याने ४५ चेंडूतच शतक केले होते. तसेच तिलकचे हे आयपीएलमधील पहिलेच शतक ठरले आहे. त्यामुळे नाबाद १०१ ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक गमावली आणि त्यांना जीटीने प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. हा सामना एमआय रोहित शर्माशिवाय खेळत होता, त्यामुळे दानिश मालेवार याला पदार्पणाची संधी मिळाली. तो ४ चेंडूत २ धावा करत परतला. त्याच्यापाठोपाठ क्विंटन डी कॉकही बाद झाला. त्याने १३ (११) धावा केल्या. नमन धीरने काहीशी फटकेबाजी करत संघाचा धावफलक हलता ठेवला, मात्र ५.५ षटकानंतर एमआयची स्थिती ३ विकेट्स ४४ धावा अशी झाली.
पाचव्या क्रमांकावर तिलक फलंदाजीसाठी आला. त्याने नमन धीरसोबत चौथ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर एमआयचा कर्णधार हार्दिक पांड्यासोबत पाचव्या विकेटसाठी ३८ चेंडूत ८१ धावांची भागीदारी केली. त्याने २० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारत शतक पूर्ण केले. त्यामुळे एमआयने २० षटकात ९ विकेट्स गमावत १९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात जीटी १०० धावसंख्येवरच गारद झाला.
तिलक या सामन्याचा सामनावीर ठरला. हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलाच सामनावीर पुरस्कार ठरला. तसेच एमआयचा हा जीटीविरुद्ध अहमदाबादमधील पहिला विजय ठरला आहे. येथे त्यांनी २०१४ नंतर प्रथमच विजय मिळवला आहे. हा विजय राजस्थान रॉयल्सविरुद्ध मिळवला होता.






