वडोदऱ्यातील बीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या WPL 2026 मधील थरारक सामन्यात गुजरात जायंट्सने मुंबई इंडियन्सवर 11 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह गुजरात जायंट्सने केवळ गुणतालिकेत मोठी झेप घेतली नाही, तर एलिमिनेटर फेरीसाठी अधिकृतपणे पात्रता देखील मिळवली.
या सामन्यात गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. विशेष म्हणजे, WPL च्या मागील 40 सामन्यांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी न निवडता फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय पूर्णपणे योग्य ठरला.
प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने 20 षटकांत 4 विकेट गमावत 167 धावांचा मजबूत स्कोअर उभारला. संघाकडून ऍशले गार्डनरने 46 धावांची दमदार खेळी केली. तिच्या साथीला जॉर्जिया वेअरहॅमने नाबाद 44 धावा करत संघाचा डाव शेवटपर्यंत नेला. सोफी डिव्हाईनने 25 धावांचे मोलाचे योगदान दिले. मुंबईकडून गोलंदाजीत अमेलिया केर हिने 26 धावांत 2 विकेट घेतल्या, तर शबनम इस्माईल आणि नेट सायव्हर-ब्रंट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
168 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात अतिशय खराब झाली. अवघ्या 7 षटकांत संघाने 37 धावांत 3 विकेट गमावल्या. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने जबाबदारी स्वीकारत 48 चेंडूत नाबाद 82 धावांची अफलातून खेळी केली. तिच्या खेळीत आकर्षक षटकारांचा पाऊस पडला, मात्र दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. विशेष म्हणजे, WPL इतिहासात पहिल्यांदाच हरमनप्रीतच्या अर्धशतकानंतरही मुंबईला पराभव स्वीकारावा लागला. मुंबईचा डाव 20 षटकांत 7 विकेट्सवर 156 धावांपर्यंतच मर्यादित राहिला.
गुजरातच्या विजयात गोलंदाजांचा मोलाचा वाटा राहिला. सोफी डिव्हाईनने 4 षटकांत 23 धावा देत 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. जॉर्जिया वेअरहॅमने अमेलिया केरचा विकेट घेऊन सामन्याचा कल बदलला, तर ऍशले गार्डनरने अखेरच्या षटकात दबाव सांभाळत मुंबईच्या उरलेल्या आशा संपविल्या.






