भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा नियमित उपकर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला नाही. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो वनडे आणि टी२० मालिकांना मुकणार आहे. मात्र, भारतीय क्रिकेट व रोहितच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. स्वतः रोहितने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे की, त्याची दुखापत आता ठीक आहे. रोहित लवकरच कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.
दुखापत गंभीर नव्हतीच
बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत असलेल्या रोहितने प्रसारमाध्यमांसोबत दुखापतीविषयी चर्चा केली. तो म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर ही दुखापत तितकीशी गंभीर नव्हती. बाहेर काय चर्चा चालू आहे याविषयी देखील मला पूर्ण कल्पना होती. मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआय हे दोघेही माझ्या नियमितपणे संपर्कात होते.”
आयपीएलमध्ये झाला होता हॅमस्ट्रिंगचा त्रास
आयपीएल २०२० वेळी मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब सामन्यात, रोहितला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला होता. त्यानंतर, तो तीन सामन्यांना मुकला. याच दरम्यान भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली. सुरुवातीला रोहितचा समावेश एकाही संघात नव्हता. मात्र, वाद निर्माण झाल्याने अखेरीस रोहितला कसोटी संघात समाविष्ट करण्यात आले. रोहितने आयपीएलच्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावून मुंबईला पाचवे आयपीएल विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
मुंबई संघ जोखीम पत्करायला तयार नव्हता
रोहितने आयपीएल दरम्यानची, दुखापतीची परिस्थिती सांगताना म्हटले, “दुखापत तितकीशी गंभीर नव्हती. मात्र, मुंबई संघ व्यवस्थापन जोखीम पत्करायला तयार नव्हते. मी त्यांना सांगितले होते की, मी खेळू शकतो. कारण, टी२० हा खेळाचा सर्वात लहान प्रकार आहे. शेवटी, मैदानात आपले १०० टक्के योगदान देणे महत्त्वाचे आहे. प्ले-ऑफ्सवेळी मी तंदुरूस्त झालो नसतो, तर त्या सामन्यातून माघार घ्यायला मी तयार होतो.”
दुखापतीतून वेगाने सावरत आहे
रोहितने आपल्या हॅमस्ट्रिंगच्या सद्यपरिस्थितीविषयी माहिती देताना सांगितले, “हॅमस्ट्रिंग सध्या ठीक आहे. त्यात दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. डॉक्टर्स हॅमस्ट्रिंग मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कसोटी मालिका प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळे, पूर्णपणे तंदुरूस्त होऊनच मी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.”
रोहितला दोन आठवडे राहावे लागणार विलगीकरणात
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची चार कसोटी सामन्यांची मालिका १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर त्याला, १४ दिवसांसाठी विलगीकरण कक्षात राहावे लागेल. त्यामुळे, रोहितकडे एनसीएत आपली तंदुरूस्ती चाचणी उत्तीर्ण करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी आहे.
म्हणून, वनडे आणि टी२० मालिकांत खेळणार नाही
वनडे व टी२० मालिकांतील सहभागाविषयी विचारले असता रोहित म्हणाला, “माझ्या तंदुरुस्तीवर अजून काम सुरू आहे. त्यामुळे या मालिकांसाठी मी ऑस्ट्रेलियाला जाणार नाही. हे सर्व सामने लागोपाठ होणार आहेत. भारतीय संघ ११ दिवसात हे ६ सामने खेळेल. त्यामुळे, मला आपली तंदुरूस्ती मिळवण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी मिळाला. मी थेट कसोटी मालिकेसाठी संघात दाखल होईल. माझ्यासाठी हा निर्णय काहीसा सोपा होता.”
भारताच्या नियोजित ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात २७ नोव्हेंबरपासून होत आहे. दौऱ्यातील पहिला वनडे सामना सिडनी येथे होईल. तीन सामन्यांच्या मालिकेनंतर, तीन सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाईल. दौऱ्याची अखेर चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीने होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराट कोहलीची विकेट महत्त्वाची’, ऑस्ट्रेलियाच्या घातक वेगवान गोलंदाजाचे मोठे वक्तव्य
‘हे’ खेळाडू ठरवतील भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा निकाल, भारताच्या दिग्गजाची भविष्यवाणी
ठरलं! ‘या’ मैदानावर होणार ऑस्ट्रेलिया – भारत पहिला कसोटी सामना