भारतीय कसोटीपटू हनुमा विहारीने आंध्र क्रिकेट असोसिएशनशी संबंध तोडले आहेत. आता विहारी आगामी देशांतर्गत हंगामात हैदराबादसाठी खेळताना दिसेल. २७ वर्षीय विहारी हा देशांतर्गत क्रिकेटमधील एक मोठा खेळाडू मानला जातो. त्याला जेव्हा जेव्हा भारतीय कसोटी संघात संधी मिळाली तेव्हा त्याने चमकदार कामगिरी केली आहे. विहारी इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा भाग होता. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट
विहारीने सोशल मीडियावर आंध्र प्रदेश क्रिकेटपासून वेगळे होण्याविषयी माहिती देताना लिहिले की,
‘मी आंध्र क्रिकेट असोसिएशनशी चांगले संबंध असताना सहसंमतीने विभक्त होत आहे. मला गेल्या पाच वर्षांत आंध्रचे प्रतिनिधित्व करण्याचा आणि संघाचे नेतृत्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. आम्ही एक संघ म्हणून एकत्र आलो आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. मी माझे सर्व सहकारी, प्रशिक्षक आणि असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे सतत पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानू इच्छितो. येत्या हंगामापासून मी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा एक भाग होईन.’
विहारी पूर्वी हैदराबादकडूनच खेळत असे पण २०१५ मध्ये तो आंध्र संघात सामील झाला होता.
शानदार देशांतर्गत कारकीर्द
हनुमा विहारीने ९४ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये ५५ च्या सरासरीने ७२६१ धावा केल्या असून, त्याच्या नावे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये २१ शतके आणि ३७ अर्धशतके आहेत. विहारीने रणजी ट्रॉफीमध्ये तिहेरी शतकही केले आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये विहारीने ८० सामन्यांत ४२.८७ च्या सरासरीने ३००१ धावा केल्या आहेत. ज्यात चार शतके आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर, विहारीला २०१८ मध्ये भारतीय संघातून बोलावण्यात आले. त्याने इंग्लंड दौऱ्यावर कसोटी पदार्पण केलेले. विहारीने भारतासाठी आतापर्यंत १२ कसोटी सामने खेळले आहेत. यात ३२.८४ च्या सरासरीने ६२४ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये या फलंदाजाने एक शतक आणि चार अर्धशतके केली आहेत. नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नव्हती. भारतीय संघातील इतर खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी युएईला पोहोचल्यानंतर विहारी मायदेशी परतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
न भूतो! श्रीलंकेला क्लीन स्वीप करत दक्षिण आफ्रिकेनी केली ऐतिहासिक कामगिरी
आयपीएलमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली खेळलेले ३ दिग्गज आंतरराष्ट्रीय कर्णधार