fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

Blog: हॅप्पी बर्थडे धोनी- रांची का छोकरा ते कॅप्टन कूल माही

-प्रणाली कोद्रे
काल धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 500 वा सामना खेळला. त्याविषयी लिहित असताना अनेक विचार मनात डोकावून गेले. मी धोनीची चाहती असल्याने त्याच्या इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यातील त्या छोटेखानी खेळीने मन सुखावले होते.
त्यात त्याचा वाढदिवस असल्याने अनेक गोष्टी मनात घोळत होत्या. हेच विचार मांडायचा हा प्रयत्न-
धोनी आणि माझं तसं नातं काय हा प्रश्न माझ्या घरातल्यांसारखा मलाही खरंचं पडतो. कारण दिवसभर घरात धोनी धोनी करणारी मी. पण खरंतरं धोनी माझ्यासाठी फक्त क्रिकेटर नाही तर असा माणूस आहे, ज्याने मला माझ्या आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायला लावले. मला क्रिकेट आवडायला लागलं त्याचं पहिलं कारणही धोनीच. त्याचे ते मानेपर्यंत रुळणारे केसं. लहानपणी माझेही केसं त्याच्यासारखे असल्याने क्रिकेट खेळताना मला हमखास म्हटलं जायचं तू धोनी. तेव्हा कळायचं नाही पण आज समजतयं किती मोठी कॉम्प्लिंमेंट होती ही.
मला तसं धोनीच पदार्पण वगैरे खरचं स्पष्ट आठवतही नाही. अगदी तेच काय मला 2007चा विश्वचषकाही नीटसा आठवत नाही. पण पुसटशी आठवण आहे. अनेकांकडून ऐकले आहे. त्यावेळी संपूर्ण नवख्या संघाचं नेतृत्व करताना धोनीने भारताला दुसरा विश्वचषक मिळवून दिला होता. पण तरीही धोनीची आणि माझी तशी खास ओळख झाली नव्हती कारण माझा या मधल्यावेळात कधी क्रिकेटशी संबंधच आला नव्हता. पण 2011 चा विश्वचषक आला आणि त्यांनंतर माझा आणि क्रिकेटचा संबंध कधी तुटला नाही आणि तो आता तुटणारही नाही. याचं एकमेव कारणं म्हणजे धोनी. कारणं क्रिकेट बघायला सुरुवात झाली तीपण धोनीमुळेच. त्यानंतर क्रिकेटशीही एक वेगळं नातं तयार झालं.
मला चांगलं आठवतयं 2011 च्या विश्वचषकावेळी मी एक वाक्य ऐकले होते, की धोनीने कर्णधारपद सोडून द्यायला हवं असं. त्यावेळी माझा तसा काही क्रिकेटशी संबंध नव्हता. पण तरीही मनोमन त्या वाक्याचा खूप राग आला होता. एक पराभव एका माणसाला इतका वाईट कसा ठरवू शकतो असा प्रश्न पडला होता. पण ही भावना फक्त फिलोसॉफिकल होती असे नाही त्यात कुठतरी धोनीबद्दलचे प्रेमही होते.
मला धोनी फक्त क्रिकेटर म्हणूनच नाही तर माणूस म्हणून जास्त भावला. मला त्याने मिळवलेल्या विजयाने किंवा पराभवाने कधीच फरक पडला नाही. कारण माझ्यासाठी तो बेस्ट होता आणि कायमचं राहिलं. त्याच्या चेहऱ्यावरची शांतता, हार-जीतनंतरचे त्याचे तेच सारखे भाव, दबावातही तोल ढळू न देणारा कॅप्टनकूल धोनी आम्हाला पाहायला मिळाला आणि त्यातून मीच नाही तर क्रिकेटमधील अनेकजणं शांततेचे महत्त्व समजून गेले. प्रत्येकवेळी आरडाओरड करुन प्रश्न सुटतं नाहीतं त्यासाठी शांतही असावं लागतं याची पहिली जाणीवं मला त्याने करुन दिली.
2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी याचेच उदाहरण होती. फक्त 130 धावसंख्येचे 20 षटकात रक्षण करणे सोपे नव्हते आणि तेही आंतिम सामन्यात. पण या माणसाने त्यावेळीही शांततेने परिस्थिती हाताळली. जेव्हा निकाल समोर आला तेव्हा तो सेलिब्रेटही केला पण त्याआधीची शांतता खूप महत्त्वाची ठरली. खरचं धोनीकडे असलेले गुण शिकण्यासारखेच आहेत.
त्याच्याकडे पाहिले तरी एक वेगळाचं आनंद मिळतो. माझ्या घरात अनेक धोनीचे फोटो लावलेले आहेत. या फोटोंशी मी रोज बोलत असेल कारण ते मला प्रेरणा देतात काहितरी नवीन करण्याची, माझ्या कामाशी एकनिष्ठ राहण्याची. ज्याप्रमाणे धोनीचे चित्त कधी ढासळत नाही तसं. तो कुठल्याही मोहाला बळी पडलेला मला तरी पहायला मिळालेला नाही. ना कधी त्याला संघाच्या फोटोत मधे स्थान हवे असते ना त्या ट्रॉफीला आपल्याकडे ठेवून घेण्याचा हट्ट असतो. त्याचा हा निस्वार्थीपणाच त्याला सर्वांच्या मनात स्थान मिळवून देतो.
त्याचा हा गुण त्याच्या अनेक निर्णयातूनही दिसून आला आहे. मग अचानक घेतलेली निवृत्ती असो किंवा कर्णधारपदाचा राजीनामा असो.
त्याची आर्मीची आवडही अशीच वेगळी. अनेक खेळाडू सुट्टीचा आनंद घेताना फिरायला जाताना दिसतात. पण हा हमकास आर्मीबरोबर वेळ घालवताना दिसतो. त्याला ना कधी लाइमलाइटमध्ये रहायला आवडतं ना तो कधी तसा प्रयत्न करताना दिसतो.
त्याच्या नर्मविनोदी स्वभावामुळेच कधी तो कोणत्या खेळाडूला वेगळा वाटला नाही, म्हणूनच तर तो जेव्हा भारतीय संघात आला तेव्हा अनेक दिग्गज खेळांडूंमध्येही तो सामावून गेला आणि आता तोच भारताच्या संघातील दिग्गज खेळाडू झाल्यानंतरही संघातील अनेक तरुण खेळाडूंना त्याच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी वाटते.
असो मी त्याची चाहती असल्याने माझ्यासाठी धोनी हा विषय संपणार नाही. त्याने अनेक आठवणी दिल्या आहेत आणि तो देत आहे. म्हणूनच कदाचीत आज कोणत्याही मैदानात गेलं तरी त्याला भरभरुन प्रेम दिले जाते मग ते मैदान भारतातील असो किंवा परदेशातलं. त्याला मिळालेले पुरस्कारही त्याच्याबद्दल खूप काही सांगुन जातात.
‘रांची का छोकरा’ म्हणून संघात आलेला हा खेळाडू आज भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला गेला. त्याचा हा प्रवास नेहेमीच अनेकांसाठी प्रेरणा देणारा ठरेल. एक चाहती म्हणून माझी एवढीच इच्छा आहे, त्याने त्याच्या खेळाचा आनंद घ्यावा. बाकी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माही…
You might also like