‘क्रिकेटचा मक्का’ म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण! सुरुवात इतकी चांगली, की पहिल्या दोन कसोटी सामन्यातच शतकं झळकवली. मग कर्णधारपद मिळाल्यानंतर देशाला जिंकायची सवय लावली, तीही अशा ‘दादागिरी’नं, की अख्ख जग थक्क झालं! होय, आम्ही ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’, ‘लॉर्ड ऑफ द ऑफ साइड’ आणि ‘बंगाल टायगर’ अशा नावांनी प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुलीबद्दल बोलत आहोत. भारतीय चाहत्यांचा लाडका ‘दादा’ आज (8 जुलै) 52 वर्षांचा झाला.
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं नवीन उंची गाठली होती. गांगुलीनं संघाला अशा स्थितीत नेलं, की देशाबाहेरही संघ आपली ‘दादागिरी’ दाखवायचा. वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग यांसारख्या स्टार क्रिकेटर्सच्या करिअरला आकार देण्यात ‘दादा’नं महत्त्वाची भूमिका बजावली. महेंद्रसिंग धोनीनंही गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतासाठी पदार्पण केलं होतं.
सौरव गांगुलीच्या ‘दादागिरी’च्या कथा आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. गांगुलीनं शर्ट फिरवणारा इंग्लिश क्रिकेटर अँड्र्यू फ्लिंटॉफला प्रत्युत्तर म्हणून केलेलं सेलिब्रेशन कोण विसरू शकेल. खरं तर, 13 जुलै 2002 रोजी इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांच्या जादुई खेळीच्या जोरावर भारतानं अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करून सीरिजवर कब्जा केला होता.
यानंतर गांगुलीनं आपला टी-शर्ट काढला आणि लॉर्ड्सच्या बाल्कनीत अशा प्रकारे सेलिब्रेशन केलं, जे इतिहासाच्या पानांमध्ये नोंदलं गेलंय. त्याच वर्षी फेब्रुवारीमध्ये (3 फेब्रुवारी 2002) फ्लिंटॉफनं मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध विजय मिळवल्यानंतर शर्ट काढून सेलिब्रेशन केलं होतं. ‘दादा’नं लॉर्ड्सवर त्याला सडेतोड उत्तर दिलं.
सौरव गांगुली मैदानावर उशिरा येण्यासाठी ओळखला जात असे. 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत गांगुलीनं स्टीव्ह वॉला दिवसा ढवळ्या तारे दाखवले होते. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह वॉ नाणेफेकीसाठी वेळेवर पोहोचला, परंतु दादाला पोहचायला थोडा वेळ लागला कारण त्याचा ब्लेझर सापडत नव्हता. गांगुली नाणेफेकसाठी उशिरा आल्यानं स्टीव्ह वॉ खूप संतापला होता.
भारतीय संघानं हा कसोटी सामना फॉलोऑन मिळूनही जिंकला. या विजयासह भारतानं ऑस्ट्रेलियाचा विजय रथ रोखला होता. त्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियानं सलग 16 कसोटी सामने जिंकले होते. विशेष म्हणजे चेन्नईत खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही सौरव गांगुली नाणेफेकीसाठी थोडा उशिरा पोहोचला होता. यावेळीही स्टीव्ह वॉ चांगलाच भडकला होता.
डाव्या हातानं फलंदाजी आणि उजव्या हातानं गोलंदाजी करणारा सौरव गांगुली भारताकडून 113 कसोटी आणि 311 एकदिवसीय सामने खेळला. गांगुलीनं कसोटी सामन्यांमध्ये 42.17 च्या सरासरीनं 7212 धावा केल्या, ज्यात 16 शतकं आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये गांगुलीच्या नावावर 41.02 च्या सरासरीनं 11363 धावा आहेत. गांगुलीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 22 शतकं आणि 72 अर्धशतकं ठोकली आहेत. गोलंदाजीबद्दल बोलायचे झालं तर, गांगुलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 132 विकेट घेतल्या आहेत.
सौरव गांगुलीनं 49 कसोटी आणि 147 एकदिवसीय सामन्यांमध्यं भारताचं नेतृत्व केलं. गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 2003 मध्ये वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली होती. त्याच वेळी, भारतीय संघ 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संयुक्त विजेता होता. गांगुली 2019-22 दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) अध्यक्षही होता.
महत्त्वाच्या बातम्या –
“महाराष्ट्र सरकारसाठी सर्व खेळ समान नाहीत”, स्टार बॅडमिंटनपटूचा गंभीर आरोप
मराठी पाऊल पडते पुढे! महाराष्ट्राच्या धावपटूनं रचला नवा राष्ट्रीय विक्रम, स्वत:चाच रेकॉर्ड मोडला
एक शर्मा गेला, दुसरा शर्मा आला! झिम्बाब्वेविरुद्ध युवराजच्या शिष्याचा कहर