जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएल २०२१ चा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने १० धावांनी विजय मिळवून हंगामाची विजयी सुरुवात केली. भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने या सामन्यातून केकेआरसाठी पदार्पण केले.
तब्बल इतक्या दिवसानंतर मैदानावर दिसला हरभजन
सध्या ४० वर्षाचा असलेला हरभजन आज(११ एप्रिल) केकेआरसाठी आपला पहिला सामना खेळला. हा त्याचा आयपीएल कारकिर्दीतील तिसरा संघ आहे. हरभजनने यापूर्वी मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स या संघांचे प्रतिनिधित्व केले होते. जुलै महिन्यात ४१ वर्षाचा होणारा हरभजन तब्बल ६९९ दिवसांनंतर कोणत्याही प्रकारचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. हरभजनने आपला अखेरचा स्पर्धात्मक सामना १२ मे २०१९ रोजी खेळलेला. हा सामना २०१९ आयपीएल हंगामाचा अंतिम सामना होता.
सहकाऱ्यांनी केले कौतुक
कोलकाता नाईट रायडर्स संघ व्यवस्थापनाने आयपीएल २०२१ च्या लिलावात हरभजनला २ कोटी रुपयांना विकत घेतले होते. कर्णधार ओएन मॉर्गनने हरभजनचे केकेआर संघात स्वागत केले. मॉर्गन म्हणाला, “हरभजनच्या येण्याने संघाचा फिरकी गोलंदाजी विभाग सक्षम झाला आहे.”
केकेआरचा माजी कर्णधार व अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिक याने हरभजनबाबत बोलताना म्हटले, “भज्जी यावेळी वेगळ्याच अवतारात दिसत आहे. त्याला निवडण्याचा निर्णय सोपा राहिला नसेल. मात्र, मागील दोन आठवड्यात त्याने ज्या प्रकारचा उत्साह दाखवला तो प्रेरणादायी आहे. तो सर्वांच्या आधी सरावासाठी पोहोचलेला असतो. तो एक वेगळाच व्यक्ती आहे.”
हरभजनची आयपीएल कारकीर्द
मागील चार वर्षापासून राष्ट्रीय संघातून बाहेर असलेला हरभजन केवळ आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १६१ सामने खेळताना १५० बळी मिळवले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे. हरभजनने काही काळ मुंबई इंडियन्सचे नेतृत्व देखील केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
बधाई हो भज्जी! आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा बनला एकमेव क्रिकेटपटू
राणाजी रॉक्स! रोहित आणि वॉटसननंतर अशी कामगिरी करणारा बनला केवळ तिसरा फलंदाज






