---Advertisement---

हॅट्रिक ते ४०० कसोटी विकेट्स, ‘या’ ४ विक्रमांमध्ये हरभजन सिंगची बरोबरी करणे नाही सोपे काम..!

Harbhajan-Singh
---Advertisement---

हरभजन सिंग (harbhajan singh) याला भारतीय संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही. हरभजनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले आणि अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून दिला. शुक्रवारी (२४ डिसेंबर) हरभजनने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली.

हरभजन मागच्या जवळपास पाच वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर होता. परंतु तो देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सक्रिय होता. अशात त्याने निवृत्तीची घोषणा केल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याच्या कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. आपण या लेखात त्याच्या चार महत्वाच्या कसोटी विक्रमांची माहिती घेणार आहोत, जे मोडणे कोणत्याही गोलंदाजासाठी जरा कठीणच काम असेल.

१. सर्वात कमी वयात ४०० कसोटी विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज –
हरभजन सिंगने जुलै २०११ मध्ये या विक्रमाची नोंद केली. त्याने डोमिकिनमध्ये कार्लटन बॉ याची विकेट घेऊन त्याचे कसोटी क्रिकेटमधील ४०० विकेट्स पूर्ण केले होते. याचसोबत तो सर्वात कमी वयात ४०० कसोटी विकेट्स घेणारा फिरकी गोलंदाज बनला होता. यावेळी त्याचे वय ३१ वर्ष आणि चार दिवस होते. जागतिक क्रिकेटचा विचार केला, तर हरभजन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येतो. पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा दिग्गज मुथैया मुरलीधरन आहे. मुरलीधरनचे वय २९ वर्ष आणि २७३ दिवस असताना त्याचे ४०० कसोटी विकेट्स पूर्ण केले होते.

२. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज –
हरभजनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये लागोपाठ तीन विकेट्स घेण्याचा विक्रम आहे आणि हा विक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज देखील ठरला होता. त्याने मार्च २००१ मध्ये कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात हा विक्रम केला होता. या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग, एडम गिलक्रिस्ट आणि शेन वॉर्न या दिग्गजांना लागोपाठ चेंडूवर तंबूत पाठवले होते. हरभजननंतर २००६ साली भारताच्या इरफान पठाण आणि २०१९ मध्ये जसप्रीत बुमराहने देखील कसोटी हॅट्रिक केली आहे.

३. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा फिरकी गोलंदाज –
हरभजन सिंगने मार्च २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत तब्बल ३२ विकेट्स घेतल्या होत्या. या प्रदर्शनानंतर तो तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. जागतिक क्रिकेटमध्ये हरभजनव्यतिरिक्त दुसरा कोणताच फिरकी गोलंदाज तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३२ विकेट्स घेऊ शकलेला नाही. या यादीत हरभजननंतर दुसऱ्या क्रमांकावर मुरलीधरन आहे. मुरलीधरनने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.

४. एका कसोटी सामन्यात दुसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज –
हरभजन सिंगने २००१ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका कसोटी सामन्यात २१७ धावा खर्च केल्या होत्या आणि तब्बल १५ विकेट्स घेतल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये एखाद्या भारतीय गोलंदाजाने केलेले हे दुसरे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन ठरले होते. या यादीत पहिल्या क्रमांकावर नरेंद्र हिरवानी आहेत. हिरवानींनी १९८८ साली वेस्ट इंडीजविरुद्ध खेळलेल्या एका कसोटी सामन्यात १३६ धावा खर्च करून १६ विकेट्स मिळवल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या –

रहस्य उलगडले, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत भारताचे ‘हे’ २ धुरंधर करणार ओपनिंग?

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

दीपक चाहरचा स्विंग पाहून चाहते चकित; म्हणाले, ‘हे फक्त आशिया खंडाच्या बाहेरच होऊ शकते’

व्हिडिओ पाहा –

आख्खी कारकिर्द संपली, पण पठ्ठे कधीही शून्यावर बाद झाले नाहीत | Batsman without Ducks in ODI Cricket

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---