---Advertisement---

तू सदैव प्रेरणास्थान राहशील! हरभजन सिंगच्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मराठमोळ्या शुभेच्छा

On: रविवार, एप्रिल 25, 2021 12:12 AM
---Advertisement---

क्रिकेट जगतात २४ एप्रिल या दिवसाला महत्त्व दिलं जात, त्यामागे कोणता सामना वैगरे नाही तर या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस असतो. क्रिकेटमधील अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केलेल्या सचिनने क्रिकेट इतिहासात एक अढळ स्थान मिळवले आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याचे करोडो चाहते आहेत. त्यामुळे त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी भारताबरोबरच परदेशातूनही भरभरुन शुभेच्छा येतात. पण यंदा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगच्या शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधले.

हरभजनने दिल्या मराठीतून शुभेच्छा
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सचिनला अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी तसेच जगभरातील चाहत्यांनी ४८ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याबरोबरच त्याला निरोगी आरोग्य मिळावे अशाही शुभेच्छा आल्या. सचिनचा माजी संघसहकारी हरभजन सिंग याने देखील सचिनला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या.

हरभजनने मराठीतून ट्विट करत सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने सचिनबरोबरचे त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. याबरोबरच मराठीतून लिहिले आहे की ‘प्रिय सचिन, वाढदिवसाच्या अनकोत्तम शुभेच्छा. फॉर्म तात्कालिक, तर दर्जा चिरंतन असतो ही उक्ती तू सार्थ ठरवली अन करोनाला चीतपट केलेस. तू सदैव प्रेरणास्थान राहशील!’

हरभजन सिंगने मराठीतून शुभेच्छा दिल्याने त्याने अनेक महाराष्ट्रातील चाहत्यांची मने जिंकली आहेत.

सचिनने दिली कोरोनाला मात
भारतात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात सचिन तेंडुलकर देखील मागील महिन्यात अडकला होता. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज खेळून आल्यानंतर सचिन २७ मार्च रोजी कोविड पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर काही दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्यात आले होते. यानंतर ८ एप्रिल रोजी त्याला घरी सोडण्यात आले होते. घरी आल्यानंतरही तो काही काळ क्वारंटाईनमध्ये होता.

सचिनचा वाढदिवशी संकल्प
सचिनने त्याच्या ४८ व्या वाढदिवशी एक व्हिडिओ शेअर करत सर्वांना एक सामाजिक संदेश दिला. त्याने संदेश दिला आहे की जे कोविड-१९ या आजारातून बरे झाले आहेत, त्यांनी प्लास्मा थेरपीसाठी रक्तदान करावे. तसेच तो स्वत: देखील रक्तदान करणार असल्याचा संकल्प केल्याचेही त्याने सांगितले आहे.

सचिनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द 
सचिनने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठी यशाची शिखरे गाठली आहेत. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २०० कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ५३.७८ च्या सरासरीने ५१ शतकांसह १५९२१ धावा केल्या आहेत. तसेच त्याने कसोटीत ४६ विकेट्स घेतल्या आहेत.

याशिवाय ४६३ वनडे सामन्यात ४४.८३ च्या सरासरीने ४९ शतकांसह १८४२६ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने १५४ विकेट्सही घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने १ आंतरराष्ट्रीय टी२० सामनाही खेळलेला असून यात त्याने १० धावा केल्या असून १ विकेट घेतली आहे.

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके केली असून हा टप्पा पार करणारा तो पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे. तसेच तो सर्वाधिक कसोटी सामने खेळणाराही खेळाडू असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाराही तो क्रिकेटपटू आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

RR vs KKR : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीला फलंदाजांची साथ; राजस्थानचा कोलकाताविरुद्ध ६ विकेट्सने विजय

व्हिडिओ : कमनशिबी मॉर्गन! विचित्र पद्धतीने झाला रन आउट, एकही चेंडू न खेळताच आला माघारी

चल बेटा सेल्फी लेले रे! रियान पराग-राहुल तेवतियाचे अनोखे सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---