भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर व अनुभवी फलंदाज रोहित शर्मा हा सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. सलग तीन पराभवानंतर मुंबई पंजाब विरुद्ध विजय मिळवण्यात यशस्वी ठरली. मुंबईचे खेळाडू त्या विजयाच्या जल्लोषात असतानाच तंतोतंत रोहितसारख्या दिसणाऱ्या एका पाकिस्तानी तरुणाचे ज्यूस पितानाचे छायाचित्र व्हायरल झाले होते. या छायाचित्रावरून रोहितला त्याचा माजी सहकारी हरभजन सिंगने ट्रोल केले.
पाकिस्तानी तरुणाचे छायाचित्र व्हायरल
दोन दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी तरुणाचे ज्यूस पितानाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. हा तरुण अगदी हुबेहूब रोहित शर्मा सारखा दिसत आहे. हे छायाचित्र रावळपिंडी येथील असल्याचे सांगितले जातेय. अगदी दोन दिवसातच या छायाचित्रावर मीम्स बनवली गेली आहेत तसेच अनेक ख्यातनाम व्यक्तींनी देखील यावर प्रतिक्रिया दिली.
हरभजनने केले रोहितला ट्रोल
सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेले हे छायाचित्र पाहिल्यानंतर भारतीय संघाचा वरिष्ठ फिरकीपटू व सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणारा हरभजन सिंग यालादेखील रोहितला ट्रोल करण्याचा मोह आवरला नाही. हरभजनने ट्विटरवरून रोहित व त्या तरुणाचे छायाचित्र कोलाज करून, कॅप्शन लिहिले,
‘कभी चाय पे हमे भी बुलाओ शन्ना!’
त्याच्या या ट्विटवर चाहत्यांनी अनेक मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Kabhi chai pe hame bi bulao shaana ???????? @ImRo45 ???? pic.twitter.com/nRSc9ts0qq
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) September 30, 2021
मुंबईचा प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी संघर्ष
सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी असलेला मुंबईचा संघ आपले प्ले ऑफ्समध्ये जाण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यांचे ११ सामन्यातून केवळ १० गुण झाले आहेत. उर्वरित तिन्ही सामने जिंकून त्यांना इतर संघाच्या कामगिरीवर नजर ठेवावी लागेल. सध्या मुंबईच्या संघातील अनेक फलंदाजांचा फॉर्म खराब आहे. त्यामुळे, मुंबईला आयपीएलच्या उत्तरार्धात सलग तीन सामने गमवावे लागले होते.






