टी20 विश्वचषक संपल्यानंतर आयसीसीनं टी20 खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं मोठी झेप घेतली आहे. हार्दिक टी20 मध्ये जगातील अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू बनला आहे. तो श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगासोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. दोघांचेही 222 रेटिंग गुण आहेत. मात्र आयसीसीनं हार्दिकला अव्वल आणि हसरंगाला दुसऱ्या स्थानावर ठेवलं आहे.
हार्दिक पांड्याला दोन स्थान आणि 9 रेटिंग गुणांचा फायदा झाला. त्यानं 2024 टी20 विश्वचषकाच्या 8 सामन्यांत 144 धावा ठोकल्या होत्या. याशिवाय त्यानं 11 बळी देखील घेतले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात हार्दिकनं 3 विकेट घेतल्या होत्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावा डिफेंड केल्या होत्या. भारतीय संघाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात त्याच्या या कामगिरीचं मोठं योगदान होतं.
टी20 अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत मोठे बदल झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिस तिसऱ्या, झिम्बाब्वेचा सिकंदर रजा चौथ्या, बांगलादेशचा शाकिब अल हसन पाचव्या आणि इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन आठव्या स्थानी आहे. या सर्वांना एक-एक स्थानाचा फायदा झाला आहे. अफगाणिस्तानचा दिग्गज मोहम्मद नबीला 4 स्थानांचं नुकसान होऊन तो टॉप 5 मधून बाहेर पडला आहे.
टी20 गोलंदाजांच्या क्रमवारीबद्दल बोलायचं झालं तर, दक्षिण आफ्रिकेच्या अॅनरिक नॉर्कियाला सर्वात मोठा फायदा झाला. तो 7 स्थानांची झेप घेऊन करीअरच्या सर्वश्रेष्ठ दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. त्याचे 675 रेटिंग गुण आहेत. अव्वल स्थानी इंग्लंडचा आदिल रशिद (718 गुण) आहे.
टी20 विश्वचषकात 15 विकेट घेऊन ‘प्लेअर ऑफ द टुर्नांमेंट’ खिताब जिंकणाऱ्या जसप्रीत बुमराहला 12 स्थानांचा फायदा झाला आहे. तो 640 गुणांसह 12 व्या स्थानी आहे. कुलदीप यादवनं 654 रेटिंग गुणांसह टॉप 10 मध्ये एंट्री केली आहे. तो तीन स्थानांची झेप घेऊन आठव्या स्थानी पोहचला आहे. तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला देखील फायदा झाला असून तो करीअरच्या सर्वश्रेष्ठ 13व्या स्थानी पोहचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तरुण वयात पडले मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात! खूपच रंजक आहे राहुल द्रविड यांची लव्ह स्टोरी
पाकिस्तान क्रिकेटची उडाली खिल्ली, गाद्या पसरवून झेल घेण्याचा सराव, चाहत्यांनी केले ट्रोल
जय शाह यांचं मोठं मन! बार्बाडोसमध्ये अडकलेल्या भारतीय पत्रकारांसाठी केला मदतीचा हात पुढे